STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

वांझोटी

वांझोटी

1 min
327

पान्हा ढगाचा पिळून माय वांझोटी हसते

तिच्या पदरात तिला बाळ लेकरू दिसते...१


माय घरट्यात रोज झुला देई नवसाचा

वाट पाहून तान्ह्याची कंठ दाटे उंबऱ्याचा...२


जवा नवस विझतो ओली कूस उजवाया

तवा पोटात बाईच्या होते पैदा वेडी माया...३


तिच्या डोळ्याचं टिपूस ओघळून फुटे झरा

राती सपान गाठून डोहाळ्याला गाव सारा...४


बिना लेकराची माय लई कासावीस होते

तिच्या गाभार मनात बाळंतीण रोज होते...५


ओलं बाळूतं पाहून चंद्र होतो भाऊराया

होती बारशास गोळा धुंद टिपूर चांदण्या...६


नाहू घाली माय रोज देव तिच्या देव्हाऱ्याचा

तिच्या मनी-ध्यानी उभा बाळ गोविंद मायेचा...७


तिची बोळवण होते तान्हं-पारडं पाहून

बाळ जोजवू कुणाचे सांग यशोदा होऊन? ...८


थोडं आभाळ फाडून नाळ जोड लेकराची

तिच्या गर्भाचा इस्तव नाहू घाल उन्हाखाली...९


माय होण्यासाठी जरी नाही शिरिमंत कूस

तिच्या पदरात घाल माय म्हणाया माणूस...१०


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy