शोकांतिका
शोकांतिका
आई वडील म्हणाले मला घरात आणावी आता सून.
त्यांच्याच कोर्टात चेंडू ढकलून म्हणालो तूम्हीच आणा नीट बघून..
सहाच महिन्यात त्यांनी मोहिम फत्ते केली,
विनाअनुदानित का असेना माझी संसारवेल सुरु झाली.
बघता बघता एक दीड वर्ष सरले,
घरात एका चिमुकलीचे आगमन झाले..
हळूहळू दोघींमध्ये ठिणगी पडायला लागली,
मलाही कळेना कुठे माशी शिंकली अन् युती का तुटली..
माझ्या बिनपगारी नोकरीचे परिणाम जाणवू लागले होते,
घरातील ओलाव्याचे वारे आता कोरडे आणि तप्त बनत चालले होते.
हळूहळू आटत चालले होते आपुलकी आणि ते प्रेमळ लक्ष,
घरातच झाला एक सत्ताधारी तर दुसरा विरोधी पक्ष..
खूप प्रयत्न करुनही मने दुरावतच चालली होती,
दोघींनीही मनोमन आपापली माणसे वाटून घेतली होती..
ज्याने त्याने आपला इगो जाणीवपूर्वक जपला होता,
निस्वार्थी प्रेमळ नात्याचा सागर जणू काही आटला होता...
कितीही प्रयत्न केला तरी मागे कोणी हटेना,
माझ्यावरच्या हक्काचा 'काश्मिरचा तिढा' काही सुटेना..
काही सुचेना काय करावा इलाज कोणता टाकावा मंत्र,
धगधगत्या घरात मी बनलो होतो अग्निशमन यंत्र..
एक म्हणे कसा आला माझ्या पोटाला तू काळ,
दुसरी म्हणे तुम्ही तर तुमच्या आई-बापाचेच श्रावणबाळ...
कसे समजावणार, पक्षपातीपणा मला करायचाच नव्हता,
एकीने दिलेला जन्म दुसरीसोबत काढायचा होता...
अश
ात मी माझ्या चिमुकलीच्या वाट्यालाही येत नव्हतो,
कारण रिकाम्या वेळेतही मी चार पैसे कमवायचा प्रयत्न करत होतो...
दोन महायुध्दं तर सगळ्या जगानं पाहिली,
आमच्या घरात आर्थिक महायुध्दं पेटले होते !
विनाअनुदान, हिवाळी ,उन्हाळी ,पटसंख्या या शब्दानी,
आता घरच्यांचेही कान विटले होते !
खचत चाललो होतो मी, संपले होते धैर्य,
विनाअनुदानीतची नोकरी म्हणजे शुक्राणु नसलेले वीर्य...
न सुटणारा गुंता होता बुध्दी झाली होती भ्रष्ट,
या तणावातच एके रात्री, हृदयाने केले मला जय महाराष्ट्र....!!
दुसऱ्या दिवशी मग एकच कालवा झाला,
गर्दीतले काही पुटपुटले बिचारा बिनपगारीच गेला..
दोघींनीही फोडला हंबरडा काय झाली चूकभूल,
पण त्यांच्यामधल्या संवादाचा आता पडला होता पूल...
घरातल्यांची आर्त किंकाळी असे कसे घडले ?
चिमुकलीचा निरागस प्रश्न ' बाबा का झोपले ?'
टाहो फोडला सर्वांनी आता उरलेली आयुष्य कसे कटतील,
चिमुकलीला मात्र वाटत होतं बाबा थोड्याच वेळात उठतील..
पण तिच्या बाबानं अर्ध्यावरच डाव सोडला होता,
आर्थिक आणि भावनिक संघर्षात तो धारातिर्थी पडला होता..
ताटकळून गेले सर्व वाट पाहून चार पाच तास,
पन्नास कावळे पण एकानेही शिवला नाही घास...
कारण माझ्याभोवती घुटमळत होते माझ्या आई वडिलांचे वार्धक्य,
पत्नीचं उभं आयुष्य, आणि माझ्या चिमुकलीचं भविष्य....!!