जीव पेरणी
जीव पेरणी
मला पडलेला प्रश्न.
का करावी 'ती' ने मशागत,पेरणी शब्दांची-
सभोवताली एवढे शब्दप्रभू असताना?'
'ती'चा जगण्याचा अट्टाहास की
'मरण' जगण्याची तिव्र ईच्छा ?
'ती' ला मारलं कुणी ? तर.'प्रेतांनी'
होय, ज्यांचे मन, बुद्धी, विचार,
सद्विचार, सद्बुद्धी सदाचार,
नितीमत्ता मेली आहे ती तर प्रेतंच!
ही प्रेतं रंगवतात पोकळपणे प्रतिभा, प्रतिमा
भारदस्त शब्दांनी
अनुकरणात मात्र शून्य
काही काढतात गळा बाईपणाचा भोग,सोस,
दुःख सांगत.
बाईच्या वेदनेवर लिहून कविता मिळवतात
टाळ्या...वाहवा....पुरस्कार....दुसऱ्याच्या
हक्काचे ...
स्वतः प्रस्थापित होण्यासाठी
कोपऱ्यात गटवू पाहतात 'ती'ला
लैला मजनू.,अमृता प्रितमच्या ऐकवत
प्रेमकहाण्या , गुलाबी दाखले देत
घेत हळवेपणाचा वेध
करीत परावृत्त तिच्या अढळ निश्चयापासून
खेचण्यासाठी पाय.
मढं मढं मिळून बनविलेले कंपू
विकृतांचे गट,झुंडी, -'मूह मे राम,बगल मे छुरी'
ठेवत लाळ घोळत, फिरत राहतात
शेपूट बनून मुखवटा घालून
'गुरू'रुपी बांडगुळांची सावली मिळावी
म्हणून. त्या झुंडीच्या मर्कटउड्या....विचकणं
हाती दिलेलं कोलीत
लावत राहतं आग ' बावनकशी शब्दकुटीस'
'ती' च्या तिला गिळता येत नाही
म्हणून वाढवीत वंचना....पेरताना अंधार.
का पडत नाही प्रकाश त्यांच्या
काळ्याकुट्ट मनाच्या कुजक्या
कोपऱ्यात?
का समजत नाहीत चेले.. म्होरक्यांची
खेळी....खल...कुटील डाव?
अमानुषपणे साहित्यिक हत्या.
मानसिक खच्चीकरण करीत
करतात स्वतःतल्या माणूसकीचे
खच्चीकरण
दावीत हिडीस प्रवृत्तीचे दर्शन
नाचतात माजल्या सांडकळपात
उधळत खूर ......टाकत
अनियंत्रित पावले
घालतात धुडगूस भडवेगिरी करीत
गल्ली, गाव, जिल्हे ओलांडतात
नवनवे साहित्यिक खून करण्यासाठी
पण 'ती'च्या पर्यंत पोहोचण्यापूर्वीच निखळतो
जबडा.....हात....दात ...दिखाव्याचे
मग फिनिक्स होत झेप घेणाऱ्या 'ती'ला
पहात राहतात हतबल...असहाय
लाचार होत खिजून, थिजून गंजल्या खोबणीतून,
तेव्हाच गवसते उत्तर की
'ती'ने पेरल्या आशा अक्षरातून
उगवताहेत शब्द संजीवनी घेऊन की
सरसरेल जीव माणसाचा ,माणूस म्हणून
'माणूस' होण्यासाठी!