STORYMIRROR

Latika Choudhary

Others

3  

Latika Choudhary

Others

पोशिंदा

पोशिंदा

3 mins
26.1K


 शेतकरीराजा,

 सलाम तुला !

तू 'राजा' आहेस.प्रजेसाठी दिनरात खपतोस.

राबतोस.जीवाचं रान करतोस.अन् रक्ताचं पाणी करतोस.....जरी फिरून जातं तुझ्या

कष्टावर पाणी.....! असू देत..

'असू देत' म्हणनं किती सोपं ह्याची जाणीव आहे.तुला काय,किती,कसं सोसावं लागतं ह्याची कल्पनाही आहे.अन् बघ मन कसं भरून

येतं तुझ्या मनाची नुसती कल्पना करून.. ..

भविष्याच्या पोषणाची......

तू जगाचा 'पोशिंदा' आहेस ...पण पोशिंदा बनतांना पोट उपाशी ठेवत पेरावा लागतो दाणा

घासातला.....जपून ठेवलेला ...काळ्या मातीत,हौसे-मौजेची ....जीवाची माती ....!

तुझी सारी हौस भागवतो बांधावरच .....इच्छा

अपेक्षांना बांध घालत ...उतरत्या प्रहरा पर्यंत...!

तापल्या प्रहरी डोक्यावर थंडपणे ऊन झेलत

हाकत असतो नांगर देहाचा....जमिनीला 

भुसभुशीत पणा यावा म्हणून.....मन मात्र पक्क

....आभाळाचा सावत्रपणा सोसण्यासाठी....!

सावत्रपणे वागतोस म्हणे पोरांशी...नुसते देत

राहतोस शब्द- 'पुढच्या पिकावर सदरा, चपला,

पाटी,पुस्तक घेऊन देईन ' असा ....अन् देत

राहतोस पिकास पैसा...पाणी...रक्त....आयुष्य

.....काळ्या मातीवर भविष्याच्या रेघोट्या आखत.....चांगल्या...वाईट.....

घेतो वाईट पणा पोरांचा.....बायकोची कुरकुर

....शेतावर रात्रंदिन कष्टाचे डोंगर उपसत...

'स्व' ला गाडत...दोष स्वीकारत.....

तसा तिचाही दोष नाही रे...!काय वाईट केलं

तिनं सुखाची स्वप्ने पाहून? तुझ्यासवे कसरत

करता करता तिलाही वाटतं कुठं कुठं मनातल्या

मनात.....शेजारणी सारखं नटावं-थटावं....

नसाव्यात कातडीचा पोत दावणाऱ्या साड्या झिरमिरीत .....घालावीत घुंगरू-काचं-नाड्या-

लावलेली रंगीबेरंगी अर्धी...तोकडी....उघड्या

पाठीची पोलकी. ....नजरा घोंगावणारी....!

पण बाई,तुझं अंगभर करकचून नेसलेलं लुगडं

....ठसठशीत रेखाटलेलं... पूर्ण सूर्याचं बळ देणारं कुंकवाचं बळ न्यारच हं....? खान्देशी

बावनकशी असं तुझं मजबूत इराद्याचं पहाट

प्रहरी जागणं....राबणं....झिजणं.... हेव्याचं

वाटतं गं आम्हा शेजारणींना ....! मशिनीच्या

जगाला सरावलेल्या.....फक्त सिनेमातच शिवार

पाहिलेल्या आम्ही.....असो.

शिवाराच्या भेगा सावळाव्यात म्हणून शेतकरी

राजा,तू शिंपडत असतो घाम दिनरात....

स्वतः च्या पायाच्या भेगांकडे मात्र दुर्लक्ष....!

तुझं लक्ष असतं नभाकडं...पाऊसचांदण्याकडं

.....चातकासारखं.....आणि तुझ्याकडे बघत

असतात जमिनीतली दाणं केविलवाणी...तुझं

प्रार्थनागीत गाभूळल्या ढगानं ऐकावं...पाझरावं

......त्यांच्यात प्राण यावा ...जीव यावा म्हणून

..........

 जीव तुझा कसा फिरत राहतो रानोमाळ....

पाखरांसवे.... या झाडावरून त्या झाडावर....

सावली मिळावी म्हणून....विसाव्याला...तनाला

....मनाला....सर्जाला सुद्धा.....!

 सर्जा हपापत असतो तुझ्यासवे....जमिनीला

श्वास देण्यासाठी......उन्हाच्या रानात....कडबा

कोरडा तोंडातच घुटमळतो....रवंथ सुरू असते

.....विचारांचे....चांदण्यांचं गाव कधी येतं.....

हिरवाईनं पारणं कधी फिटतं ह्याची वाट बघत

सारं आभाळ उतरलेलं पापणीवर पाखरांच्याही

.....!

पाखरांच्या ओठातून येते धून जगण्याची....

मोडलेलं घरटं.... पुन्हा...नवीन उभारण्याची 

त्यांच्यासाठी......अन् छप्पर शेतकऱ्याच्याही डोक्यावर उभारण्याची.....कारण........

कारण ते जाणतात....त्यानं दिला देह त्याचा

आंदण रानाला वंचीत असा...वस्त्राला....

भावनाना गाठी मारीत.....तयार करतो खळं....

येणाऱ्या सुगीसाठी.....तयार करतो आरती

देहाची.....पानापानातल्या....दाण्यादाण्यातल्या

ईश्वरासाठी....!   ईश्वराच्या पायी सारा ठेवत

......बांधत असतो आपल्या कष्टाचे....स्वप्नांचे

उत्साहाने........!

 स्वप्न हिरवाईचे....बाईचे....पोरांचे....

पाखरांचे....,तुडवली जातात कधी अवर्षण तर

कधी गारपिटीच्या वादळाने.....! ठिगळे लावत

असता पुन्हा फाटतं आभाळ डोक्यावरचं.....!

डोक्यावरचं ओझं कर्जाचं ....व्याजाचं.. सावकाराचं.... पिकल्या कणसाचं.... पोरीचं..! वाट पहात बसलेली सुगीची....

भांबावलेली ...हिरमुसलेली....कोमेजलेली...

आकसलेली...पस्तावलेली. तरी देते धीर बापाला आश्वासक....!

आश्वासने होतात मृगजळ शासनाची....

सावकाराची.....

सावकार होतात मोठे अन् घटत घटत नाहीशा

होतात सोयी सवलती....मार्गही जगण्याचे...!

डोळ्यापुढे अंधार.....दिसतो मार्ग फक्त

आत्महत्या....

दूर होतात नाती.....जवळ येतो फासाचा गळ

.. ... विहिरीचा तळ.....विषयाची कुपी....

दिवस फिरतात म्हणून......!

पण शेतकरी राजा,

बसलेले दिवस घर बांधत नाहीत....आले तसे

निघून जातात. ...भरते जखम भळभळती एकदा ...फुंकर वेदनेवरी देऊन जातात.....

लक्षात ठेव,

संघर्षच जीवन घडवतो....संकटेच संधी देतात......

काटेरी वाट टाळतो माणूस पण काटेच

वाटेला बळ देतात....म्हणून...

 म्हणून असं कधी खचू नको           

मृत्यूला कवटाळू नकोस...

मरणाने प्रश्न कधी सुटत नसतात

धैर्यानेच मार्ग गवसतात

मृत्यूने संपत काहीच नाही

जीवन इतके स्वस्त नाही

पोरकं कधी समजू नकोस

घराला पोरकं करू नकोस

आम्ही सारे पाठीशी राहू

वेळीअवेळी साथ देऊ

अनावश्यक खर्च टाळू

हौसे मौजेला आळा घालू

दारोदारी झाडे लावू

पाण्याचा थेंब थेंब वाचवू

शेतकरी नाही तर शेत नाही

शेत नाही तर पीक नाही

पीक नाही तर खाणार काय?

बळीराजाशिवाय जगणार काय?

.......

हे बळीराजा,

प्रत्येक झगडा थांबविण्यासाठी नसतो...

पुनश्च सावरून उठण्यासाठी असतो....

म्हणून उठ राजा उठ,उठ मावळ्या उठ....

शिवाजीचा मर्दगडी तू, सरणावरूनी पुन्हा 

उठ....!!!


Rate this content
Log in