Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Latika Choudhary

Tragedy

3  

Latika Choudhary

Tragedy

बाबा

बाबा

4 mins
14.2K


 सनातनी तुमच्या आई- बाबांनी

 कोवळ्या - पिवळ्या किरणातच

 चढवलं तुम्हाला बोहल्यावर

 शेंदरी रंगांच्या साक्षीनं 

 जीवनात सप्तरंग भरावेत म्हणून

 माझ्या मायचा कोवळा हात हाती घेऊन,

 दोघांनी निष्पाप मनानं घेतल्या शपथा

 वेदीभोवती, विधी म्हणून...

 ( ऊ )जळण्यासाठी आयुष्यभर.

 भातुकलीच्या खेळातली नवरा नवरी

 तुम्ही दोघ , लपंडाव खेळत, कळले नाही

 कधी कवेत शिरलात वसंतऋतुच्या,

 नकळत तसे आम्ही अंकुरलो तुमच्या

 भावविश्वाच्या कल्पवृक्षावर

 पण कशामुळं? का कुणास ठावूक?

 शापग्रस्त झाला कल्पवृक्ष, अन 

 लागली कीड वाळवी सुद्धा,

 पाळामुळासकट पोखरणारी.

 नावा गावासकट नेस्तनाबूत करण्याचा

 कुटील डाव मनात रचत

 निवडुंगाच्या संगतीत रिचवले 

 काटेरी घोट रातदिन.

 आपल्याच धुंद दुनियेत कधी ठेचाळत,

 पडत झडत आयुष्यच प्यायलेत

 ओढून डोळ्यावर कातळ.

 उजेडाशी फारकत घेत

 बाबा, का -कसे कळले नाही कधी

 तुम्हाला आभाळाचं निळं नितळ देणं

 आणि वसुंधरेचं समर्पण ?

 माझी माय झुरतच राहिली तुमच्या

 गुलाबी शब्दासाठी 

 अन तापल्या ऊन्हात थोडी छाया

 मिळावी म्हणून.

 तुमच्या डोळ्यात मात्र नेहमी दाटलेलं

 असायचं आभाळ काळ्याशार       

 भविष्याचं ...विषारी.

 बाबा, तुमच्या नसातलं विष ऊतरल्यावर

 मात्र व्हायचा 'माय', अन 

 फिरायचा डोक्यावर मायेचा हात, 

 फक्त माझ्या...

 मायसाठीच्या दाहक कोपऱ्यात 

 कुठंतरी नक्कीच अंकुरायची माया

 माझ्यासाठी...

 हाडामांसाच्या देहात...खडकात

 वांझ भूमीवरही

 दिवसातले तुम्ही कडकमास्तर.

 तुमच्या वेताच्या छडीनं आम्हाला

 शिकवली पावकी...निमकी... दिडकी.

 पण कळले नाही,स्वतःची का करीत

 राहिलात नेहमी वजाबाकी अन

 आईच्या भाग्याचा भागाकार

 माय तशी बावनकशी.

 कुंकुला जपणारी. तरी ना जाणे 

 का जुळली नाही तार कधी तुमच्या

 हृदयाच्या विणेची ?

 स्त्रीत्वाने काठोकाठ भरलेली

 माझी माय, तुमची पावलं स्थिर

 व्हावी म्हणून पुन्हा पुन्हा

 जडावत होती. भारावत होती. 

 झिजतच होती.खपतच होती.

 वेलीवरची फुलणारी फुलं पाहून

 सुखावत होती. कधीतरी तुमच्या 

 मनाचा कोपरा मिळावा म्हणून

 दुभंगल्या भुईवरही तग धरून होती.

 अंधारल्या संसारात एक ठिपका

 प्रकाशाचा शोधीत होती.

 तुम्ही मात्र अंधार पीत उभे,

 अंधारमय.

 बाबा, असं ऐकलंय की,

 मुल होईल म्हणून मोहरून जातं

 बापाचं मन.... दुप्पटीनं येतं बळ.

 घेतो अर्धांगिनीची काळजी उठता बसता.

 न्याहाळत राहतो बापाला जन्म देणाऱ्या

 पोटातल्या भविष्याकडे

 बाळाला मिरवितो सारीकडे.

 मग बाबा

 असं कोणत्या ऋतूतलं अजब मन तुमचं

 जे कधी मोहरलंच नाही..?

 का कधी हिरवी,गुलाबी स्वप्न

पाहिली नाहीत?

 डोळ्यात झोप नव्हती म्हणून ,की...

 जागेपणीही झोपेतच होते म्हणून....!

 बाबा,

 तुमचं कर्ज अंगावर घेत माय

 तुमचं भक्कम छप्पर आमच्या

 डोक्यावर रहावं म्हणून विणवायची हो

 तुम्हाला 'दयाधन' मानून ?

 का दिसली नाही कधी तिच्यासोबत

 आमचीही दैना,जीवाची-जीवनाची 

 आबाळ,अवहेलना ?

 निदान स्वतःचं एकदाच लाभणारं

 देहदेऊळ तर जपलं असतं?

 करीत राहिलात अभिषेक सोमरसाचा.

 माय मात्र कोरडीखट्ट....

 ऊस काढल्या चिपाडागत

 बाबा, पोरांच्या आयुष्याच्या वळणावर

 नेहमी बाप उभा राहतो असे म्हणतात...

 बाप दिसलाच नाही हो कुठे 

 हात देण्यासाठी ! का बाबा का ?

 कोण तुम्ही? साधू की सन्यासी ?

 अशी कशी ही विरक्ती? 

 माणसाचा देह घेऊन जन्मलात तुम्ही ,

 पण का छातीत ठेवलंय दगडाचं हृदय ?

काट्याचा दाह सोसत फुलांची

 वाट करणाऱ्या माझ्या मायसाठी

 आभाळमायेसाठी तरसणाऱ्या 

 आमच्यासाठी , का नाही फुटला पाझर

 तुमच्या कठोर काळजाला ?

बाटलीसवे घरंगळत जाणारा 

 आमचा बाप....

 मायेच्या दुष्काळाच्या झळा सोसणारी,

 रापणारी आमची माय ....

 संसारातली आटणारी बापाच्या 

 प्रेमाची ओल....

 तिला जाळणाऱ्या झळा,

 बापाला कधीच न लागलेला जगण्याचा

 लळा...

 हे सारं सारं पाहून आमच्या हृदयात 

 शिरणारा वेदनांचा भाला.....

 अन आमच्या बालसुलभ भावनांचा काला,

 असं सारं ओझं पाठीवर ओढत

 आकार देऊन निराकार होणाऱ्या बापाची

 पिढी पुढे रेटतच आहोत

 बाबा, गलबलून येतं मधून मधून

 पण जेव्हा आठवतो घामाच्या थेंबातला

 माझ्या मायचा प्रवास

 तुमच्याशिवायचा..... तेव्हा वाटतं....

 तेव्हा वाटतं, मायच्या त्या अडाणी धाराच

 बनल्या गंगाजल आम्हा पोरांचं जीवन

 सिंचावं म्हणून

 अन घडवलं आम्हाला त्याच रापल्या

 मनगटांनी , विझवत वणवा मनातला.

 पेरला वसंत आमच्यासहित

 तुमच्याही मनात, जगण्यात , न हारता           

 अथकपणे

 तुम्ही भेट दिलेल्या दुःखाचं घोंगडं

 मायनं खांद्यावर पेललं. अन उन्हातलं

 झाड होऊन सुर्य डोक्यावर नाचवत

 चंद्र तुम्हाला देत राहिली. उशिरा का

 असेना तुमच्या शुष्क मन:पटलावर

 अंकुरलं जिव्हाळ्याचं रोपटं 

 अन फुटली पालवी हिरव्या हर्षासवे .

 सुर्य रोज उगवायचा, पण नसायचं

 कुठलंच नातं त्याच्याशी काहीही...

 तरीही कातळाशी झुंजत 

 अंधाराकडून अंधाराकडचा होणारा 

 तुमचा प्रवास माझ्या मायच्या

 तपस्येनं बदलला...

 जिद्दीनं फुलवलेल्या तुमच्या

 वाळल्या मळ्यात ओतले तिने पंचप्राण

 अन दिसला हिरवा बहर

 अखेर तुमच्या डोळ्यात!

 बहरला बाबा तुम्ही पोरासवे

 अन उचलला हात अंधारावर

 उजेडाची नक्षी काढावी म्हणून...!

 भरून पावली माझी माय 

 पाहून भरला सुगंध 

 तिच्या आसमंतात कष्टाच्या चांदण्याने...!

 तुटक्या सुईच्या नोकानं भरपूटं कोरीत

 जुनी दुखणी ऊसवणं तिला कधीच

 आवडलं नाही.

 म्हणूनच की काय विसरली सारं तुमचं

 वादळी देणं...अन स्विकारलं तुम्हाला

 अमच्यासकट तिच्याही कुंकवाला,

 नावाला बळ मिळावं म्हणून,

 घराला घरपण,पूर्णत्व यावे म्हणून....!

...........

 कारण........कारण तिनं अनुभवलं

 निराधार कपाळाचं भयानक जग.

 तिनं सोसलाय टिचल्या बांगडीचा

 थरथरणारा हात. तिनं केलाय वादळी

 एकटा प्रवास, पाहिलंय लांडग्याचं

 भेसूर जग, जे तिला वारंवार तुमच्या

 अस्तित्वाच्या आवश्यकतेची जाण

 करून देत दचकवत होतं......!

............

 म्हणूनच वैशाखवणवा पेटत असतानाही

 तुम्हाला कपाळावर जपलं तिनं

 तळहातावरच्या फोडाप्रमाणे....

 शेवटी फोडाप्रमाणेच अल्पायुष्य

 घेऊन जन्मलात तुम्ही ...

 आणि क्षणात फुटून...पुसून गेलात

 माझ्या मायचं सौभाग्याचं लेणं.....!

............

 तुमचं जागणं आणि पुन्हा निद्रिस्त

 होणं , सारं स्वप्नवत तिच्यासाठी..

 पोरी आम्ही रमलो सासरी आईसारख्याच

 'आहे त्याच्या सह,नाही त्याच्या सह'

 धडपडत.....

 पोरांनी थाटली वेगळी घरटी.

 तिचं घरटं पुन्हा रिकामं...

 पोकळ....पण तरीही वेळूच्या बासरीप्रमाणे

 स्वतःस छेदून घेत, इतरांच्या जीवनात

 सूर निर्माण करायला तयार असणारं

 बाबा, आजही तिच्या कपाळावर

 तुमच्या नावाच्या कुंकवाचा व्रण आहेच...

 तिच्या आणि आमच्याही नावामागे

 तुमचं नाव आहेच

 भावभिजल्या आठवाने येणाऱ्या अश्रुत

 आजही तुमचं अस्तित्व आहेच...

 त्याच अश्रूंनी माय जणू आजही तिर्थस्नान

 करते व पावन होते.

 आजही तिचे डोळे आपल्याच वाटेला

 लागलेत.

 आपण देहरूपात असल्यावरही

 किंवा नसल्यावरही आम्हास 'माय-बाप'

 बनून पुर्णत्वास नेणारी माझी माय

 अपूर्ण का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy