चल ना गं आये,
चल ना गं आये,


चल ना गं आये, फुलं इकायला जाऊ,
मिळणाऱ्या पैसासगट थोडी सप्न बी घेऊन येऊ,
काल बाई म्हणत होत्या यक मोठी परीक्षा हाय,
फी भरल्याशिवाय मातर त्या परीक्षेला बसता यायचं नाय,
त्या परीक्षेत नंबर मिळवुन तुह्या मालकिणीच्या पोरीगत पेपरात फोटु देऊ.
चल ना गं आये, फुलं ईकायला जाऊ.
चल ना गं आये, फुलं इकायला जाऊ,
मिळणाऱ्या पैसासगट थोडं सुख बी घेऊन येऊ,
पिंट्या किती दिसापासुन आज वाढदिवस करायचा म्हणून हट्ट करत हाय,
काय तरी गोड धोड केल्याशिवाय तो शांत व्हायचा नाय,
शिरीमंत आणतेत तसा आपण मात्र छोटासाच एक केक घेऊन येऊ,
चल ना गं आये, फुलं ईकायला जाऊ.
चल ना गं आये,फुलं ईकायला जाऊ, मिळणाऱ्या पैसासगट थोडी उसंत बी घेऊन येऊ,
चार दिसांपासून काम करून बा च्या हाता-पायाला फोडं आली हाय,
औषध पाणी केल्याशिवाय त्यांना आता आराम मिळायचा नाय,
डाक्टरकडं जाणं व्हायचं नाय पण लावायला यखादं औषध घेऊन येऊ,
चल ना गं आये, फुलं ईकायला जाऊ.
चल ना गं आये, फुलं इकायला जाऊ,
मिळणाऱ्या पैसासगट थोडं संरक्षण बी घेऊन येऊ
शेजारची य
मुना मावशी म्हणत होती तुझी आय फाटकी साडीब्लाऊज घालते हाय,
त्यामुळेच कित्येक सैतानी नजरा तुझ्यावर पडत्यात हे काय मला कळत नाय,
नवी-कोरी साडी नाय पण यखादं कापड घेऊन साडीला ठिगळ लावून येऊ,
चल ना गं आये, फुलं ईकायला जाऊ.
चल ना गं आये, फुलं इकायला जाऊ,
मिळणाऱ्या पैसासगट थोडं समाधान बी घेऊन येऊ,
परत आल्यावर मैत्रिणीसाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन जायचा हाय,
बाईचा आवडता निशिगंध शाळेत लवकर जाऊन त्यांच्या टेबलावर ठेवायचा हाय,
यातले काही छान-छान फुलं तुझ्या गणरायाला बी वाहू,
चल ना गं आये, फुलं ईकायला जाऊ.
थांब ग पोरी , फुलं ईकायला तुला कसं नेऊ,
हे संसाराचं वझं आत्ताच तुह्यावर कसं देऊ,
हे सगळं व्हणार हाय, तुह्यासाठी म्या सगळं सुख-समाधान सप्न घेऊन येणार हाय,
पण तु मातर हा भार आता उचलायचा नाय,
आमच्या नशिबाचे भोग तू भोगायचे नाय,
आजपासून फुले इकायला फक्त म्याच जाणार हाय,
पढाई करून तुला लई मोठं व्हायचं हाय
तू मोठी झाली की आम्ही बी मोठ्ठ होऊ
तू आता नको म्हणू बाई,
फुलं इकायला जाऊ, फुलं ईकायला जाऊ.