धिक्कार
धिक्कार


असं वाटू लागलंय
मनात कोंडून ठेवलेल्या कविता
उगाच सोलून काढल्या उरातून
विनाकारणच केला
शब्दांचा उगाळून कोळसा
हे माहीत असूनही की
तरणार नाहीत कुठल्याही इंद्रायणीत
हे पोकळ वाटणारे पण अर्थवाही बुडबुडे
केलाच कशाला हा लेखनप्रपंच
जो चालत नाहीये
या चलनी नोटांच्या बाजारात
जिथे कवीपेक्षा छिनाल देहविक्रय
आणि आत्म्याचा लिलाव परवडतोय
इतकं होऊनही
कवींच्या सावलीच्या मागे लागलेत
वाघाचं कातडं पांघरलेलेले
इरसाल लांडग्यासारखे चिंतातूर जीव
कळतच नाहीये की
त्यांना का नकोसा झालाय
कवितेला डोक्यात चिणून घेऊन
वाचकांच्या दारोदार हिंडणारा
आणि काव्याच्या प्रातांत भरकटलेला
दबंग कविता लिहूनही
भणंग राहिलेल्या कवीचा
तितकाच भिक्कार आत्मा