गेलास का?
गेलास का?
जायचेच होते परतून तुजला तर तू आलास का?
आम्हाला विरह अग्नीमध्ये ढकलून गेलास का?
रंगविली होती किती स्वप्ने तुझ्या रे आगमनाची?
आमच्या स्वप्नांना निर्दयपणे तुडवून गेलास का?
किती प्रतिक्षा होती रे तुझ्याच येण्याची सर्वांना
सर्वांनाच असा भारी चकमा देऊन गेलास का?
कौतुके खेळवायच्या हातांनीच तुला निरोप दिला
असा निष्ठूर खेळ आमच्याशी खेळून गेलास का?
का तव नजरेस दिसले एखादे भयानक भवितव्य?
आम्हा त्यातून सोडवण्यासाठी निघून गेलास का?
तुझ्या मातापित्यास मी समजावू कोणत्या मुखाने?
ही अवघड कामगीरी मजवर सोपवून गेलास का?
लिहिली असती किती सुंदर सुंदर कवने तुझ्यावर
अशी विराणी लिहिण्याची वेळ देऊन गेलास का?