उलटा प्रवास
उलटा प्रवास


पिकवून पोसतो जो साऱ्या जगास आहे
का शेवटी गळ्याला त्याच्याच फास आहे
आहे कुठे भरोसा येथे कुण्या ऋतूंचा
का चालला जगाचा उलटा प्रवास आहे
ती पाहताच बाला बुढ्ढा जवान झाला
माणूस वासनेचा झालाय दास आहे
ते लावतात झाडे, खड्डे जुनेच आहे
तो नेहमी तयांचा व्यवसाय खास आहे
नाही कुणी कुणाचे लोभी असे धनाचे
ते आपले असावे खोटाच भास आहे
ज्यांच्यामुळे जगी या खेळावया मिळाले
वृद्धाश्रमात का हो त्यांचा निवास आहे
गर्भातल्या मुलीला मारू नकोस आई
दुनियेमध्ये मुलींचा होतोय ऱ्हास आहे
सोसून त्रास, देते सर्वांस अन्नपाणी
का त्या वसुंधरेला केले भकास आहे