शिकार
शिकार
घनगर्द जंगलात
घुमतात हाकारे हाकाऱ्यांचे
अन शिवशिवतात बेरके हात
सशस्त्र आणि निर्दयी शिकाऱ्यांचे
तशी इतका वेळ बागडणारी
असहाय्य वनचरे
खुनशी शिकाऱ्यांची चाहूल घेत
उधळतात दाहीदिशाना
भयाकूळ होऊन
सगळे जंगलच थिजून जाते
या थरारक शिकारीचा
मूक साक्षीदार होऊन
हा नृशंस खेळ पाहताना
शेवटी अखेरचा डाव जिंकण्यास
सज्ज झालेले शिकारी आणि हाकारे
आपल्या जुलमी क्रौर्याचे जल्लोष करीत
एका निरपराध जीवाचा
हकनाकच बळी घेतात
मात्र त्यांना याची कल्पना नाहीये
की रक्ताने रंगलेल्या या खेळाची
नवी खेळी आता खेळली जाणार आहे
ज्यात सगळं जंगलच उठणार आहे
या उद्दाम शिकाऱ्यांना हाकारे घालत