थवे पाखरांचे
थवे पाखरांचे


दूरवर पसरलेल्या निरभ्र आकाशातून
चिमुकले पंख फडफडवीत
झर्रकन उडत जाणाऱ्या पाखरांचा थवा
नजरेच्या टप्प्यात येताच
थरारून जाते अवघे जंगल
त्यांच्या या मुक्त आणि स्वैर उडण्याचे
कौतुक तेव्हापासून कमीच होत गेलंय
जेव्हापासून माणूस उडू लागला
जगभरातील आकाशाला कवेत घेत
पण आताशा धडकी भरते त्याला
हजारो फूट उंचीवरून उडत आणि
पाखरांशी स्पर्धा करत
त्यांच्या आकाशात मुक्तपणे संचारताना,
जेव्हा धडकतात हजारो पक्ष्यांचे थवे
एखाद्या माज चढलेल्या विमानावर
जंगल मात्र बोलावतेय
उडत्या पाखरांना आपल्या अंगावर
अगदी बिनधास्त बागडण्यासाठी