का अश्या गर्दीतुनी
का अश्या गर्दीतुनी
का अश्या गर्दीतुनी प्रत्येक माणूस सोवळा
अन भकासी चेहऱ्यांवर मुखवट्यांचा सोहळा
का आसुरी सुख आता दुःखात दुसऱ्याच्या मिळे
का असा अजगर विषारी आतला अश्रू गिळे
आतूनी कुरतडती स्वतः वरवर मुलामा सोज्वळा
अन भकासी चेहऱ्यांवर मुखवट्यांचा सोहळा....
येई मनी कित्येक वेळा प्रश्न दृश्य हे पाहुनी
काय मिळते या जगा फसगत स्वतःची करवुनी
काट्यांपरी निबरी मने परी आभास केवळ कोवळा
अन भकासी चेहऱ्यांवर मुखवट्यांचा सोहळा....
आटले हृदयातल्या भावनांचे सारे झरे
अज्ञात स्पर्धा चहूकडे उडती दिशाहीन पाखरे
आकाशही वाटून घेतील भाग उडण्या वेगळा
अन भकासी चेहऱ्यांवर मुखवट्यांचा सोहळा
कोठे पळे जग हे लुळे की जाहले हे आंधळे
कसल्या विरोधी भावना त्यालाही ना हे आकळे
भक्ती कुठे उरली खरी शोधी 'तो' ही भाबडा
अन भकासी चेहऱ्यांवर मुखवट्यांचा सोहळा