प्राणवायू
प्राणवायू
रक्ताळलेल्या कुऱ्हाडींना थकलेल्या हातांचा
आणि भेदरलेल्या घरट्याला चिमुकल्या श्वासांचा
थांगपत्ता लागता कामा नये...
कारण इथे,
तासलेल्या भुजा घेऊन माणूस आलाय!
आभाळ पेटवून मशाली करणाऱ्या
मातीत पाय रोवून छातीत घाव घालणाऱ्या
कत्तलखोर माणसांच्या अट्टल वंशाचा
तासलेल्या भुजा घेऊन माणूस आलाय!
माती विकून छाती फुगवणाऱ्या
टाळूवरचं लोणी चाटून स्वार्थाचं तेल खाणाऱ्या
बेवारस घराण्यातील माणुसकीचा
तासलेल्या भुजा घेऊन माणूस आलाय!
तेव्हा काळजाचा ठोका चुकवून
संसर्ग झालेल्या मुक्या वायूला बेभान सोडून
आतल्या आत स्वतःला धक्के देत
माणसाच्या शरीरातला प्राणवायू बाहेर येऊ द्या....
मगच पुढे,
भेदरलेल्या
घाबरलेल्या
सोसलेल्या
माणसाच्या आतल्या माणसाला
हिरव्या फांदीच्या श्वसनाचा अंदाज कळेल.....!
