अंतरीचा बाप
अंतरीचा बाप


शिळ्या भाकरीचा घास
बाप खाई शिवारात
ऊन डोईवर घेई
कष्ट भिजते घामात
बाप पितो कधी वारं
अंगी चढवितो नशा
बाप उनाड नभात
कशी पाझळतो आशा
बाप ढेकूळ मातीला
हात जोडून पाहतो
त्याच्या वांझोट्या रानात
दाणं कर्माचं पेरतो
बाप आषाढ श्रावण
बाप विठ्ठल वाटतो
वारी पिकाची पाहता
बाप सोहळा भासतो
कूस मायेची निर्मळ
पान्हा अमृत पाजते
बाप मुक्या भावनेचा
माया रक्तात वाहते
मन भजनी होऊन
बाप छंद श्वास होतो
टाळ मृदंग होऊन
बाप अंतरी नाचतो