बोळवण
बोळवण


देवा माहेरच्या दारी माझा ईस्तव पाठवा
डोळं चिंबून मायेला राख हळद दाखवा ...१
वाफ आभाळाला जाता ढग जाऊ द्या माहेरी
सासरच्या अंगणाला थेंब लागू द्या जिव्हारी ...२
भोळ्या माहेरच्या लोकां जाच माझा नका दावू
उनं-दुनं भाजलेल्या अंगी बट्टा नका लावू ...३
बाप डोरल्याचं पाणी जर सावडाया गेला
त्याला गावंल काळीज शांत निखारा झालेला ...४
माझ्या माहेरच्या सया जवा पंचमी येतील
मला भेटण्या हिंदोळे कसे आभाळी जातील ...५
माझ्या लेकराच्या मागं नगा सवत पाठवू
लेक पोरकी फाटकी; कसा उन्हाळा पचवू? ...६
थोडी उसंत घेऊन पुन्हा जलम घेईन
माझ्या लेकीच्या पोटाला लेक होऊन येईन ...७
बाळ लेकीच्या अंगणी धुंद बरसाव्या सरी
सय येईल लेकीला माय बोलावते घरी ...८
लेक भिज पावसात चिंब गारवा घेईल
माहेरची बोळवण ओल्या डोळ्यानं होईल ...९