माझी शाळा वाट बघतेय...
माझी शाळा वाट बघतेय...


मायचं डोळं घालवलेल्या धुपानात
रट भाकर चुरून खाताना
दगडागत घट्टे पडलेल्या बापाच्या हाताकडं कुणाचंच लक्ष नव्हतं
ना मायचं ना स्वतः बापाचं...
खादाड बापानं भूक आवरून पुसलेल्या हाताकडं माय मात्र रोज बघायची
अन् टचकन पाणी आलेल्या डोळ्याला पुसत म्हणायची,
तेवढं लेकराच्या शाळेचं अवंदा बघाच....!
बाप दरसालागत व्हय म्हणायचा
अन् धोतराचा कोचा धरून रागानं निघून जायचा...
बापाच्या रागाचं अन मायच्या अश्रूचं गणित
सुटत नसलेल्या कोड्यागत तवा पोटात कालवायचं..
.
बाप ऊस तोडायचा अन् माय मोळ्या बांधायची
थोरली बहीण मला घेऊन पालावर खेळायची...
खेळता-खेळता ती माय-बापाची गाऱ्हाणी सांगायची
डोक्याला तेल बी नाही म्हणून मायला कोसायची...
तवा तिच्या शहाण्या झालेल्या रूपाचं कोसनं
अन् माय-बापाला पाण्यात पाहणं
माझ्या वाढत्या अंगाला नाही कळायचं...
पण माय दरसाल मला शाळेत धाडण्यासाठी कुढत राहायची
आता वाढलेल्या माझ्या वयाची बापाने उचल घेतलीये
ऊसाच्या फडात अन् फाटक्या पालात माझी शाळा वाट बघतेय...