STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Abstract

3  

गोविंद ठोंबरे

Abstract

माय बहीण

माय बहीण

1 min
95


माय बहीण माझी,चूल पोताऱ्याचा हाथ

मूग गिळून नांदे,नसे सासरची साथ

थोरली ती माझी,ओढे संसाराचा गाढा

धनी दुरल्या देशी,पदरी लेकराचा ओढा


मला रोज सय येई,अक्का येशील तू घरा

धागा धागा काळजाचा,तुझ्या नशिबाचा दोरा

माझ्या रिकाम्या हातानं, राखी उदास उदास

चिमणे येशील तू कधी,झाप भकास भकास


माझ्या बहिणीची माया,दारी येऊ कसा तुझ्या

पडे काळजात खोल,घाव बाहुलीचा माझ्या

नको परकी तू होवू, भाऊराया मी धाकटा

संगं नांदेल मी तुझ्या,हाथ धरून एकटा


सांग मनास तू माझ्या,काय ओवाळणी घालू

पैसा नसे तुला मोल,नेस माहेरचा शालू 

तुझ्या ओटीत बहीणा,सुख संसाराचे पडो

कुंकू बळकट तुझं,दीर्घायुष्य गं वाढो


माझी दुसरी तू माय,झुला दिला तू पाठी

घास भाकर तुकडा,घातला मुख ओठी

माये पोटास मी यावे,तुझ्या पुढल्या जन्मी 

तुझी कूस मज मिळो, मातृत्वाची नरमी


Rate this content
Log in