झोपडीतली दिवाळी..!
झोपडीतली दिवाळी..!
लक्ख झगमगाट जेंव्हा
दिवाळीचा लांबवर दिसत होता
तेंव्हा मिणमिणता दिवा
झोपडीत माझ्या तेवत होता
भरजरी पोशाख जेंव्हा
पुतळ्यांच्या अंगावर चमकत होते
तेंव्हा बाप माझा फाटकी
चड्डी ओल्या डोळ्यांनी शिवत होता
वाटले नशीब लिहिताना बापाचे
देव काय झोप काढत होता
की सुरापान करून धुंद
मैफिलीत नर्तन करीत होता
तेवढ्यात आकाशात एक बाण
लक्ख प्रकाश घेऊन झेपावला
सरते शेवटी धडम करून फुटला
आणि रंगीबेरंगी चांदण्या चमचमल्या
अंतरात लक्ख प्रकाश पडला
दारिद्र्याचा कलंक विरुन गेला
फिनिक्स डोळ्या पुढे झेपावला
भाग्याने आमच्या झोपडीत प्रवेश केला
म्हंटले दिवाळीने मजला खूप दिले
दहा हत्तींचे बळ अंगी संचारले
फाटक्या चड्डीचे भय निमाले
जेंव्हा ध्येयाने शरीर माझे शहारले
ध्येय वेडा मी झालो
जादू अशी जीवनात घडताना
सारे विश्वच कवेत आले माझ्या
झोपडीतून आत्मविश्वासाने बाहेर पडताना...!!