रुढींचा ढिगारा
रुढींचा ढिगारा
चिरडले गेले कित्येक जण
रुढींच्या या ढिगार्याखाली,
होरपळल्या हजारो पिढ्या
अज्ञानाची विषबाधा झाली ॥१॥
वैचारिक ठिणगीचा वणवा
स्त्री-पुरुष लिंगभेद घडवी,
अक्कल गहाण भोंदूपाशी
क्रूरता, पाशवी वृत्ती वाढवी ॥२॥
सतीप्रथा, हुंडा, केशवपन
कृष्णविवर हे भगिनींसाठी,
पुरुषार्थ कसला गाजवता?
हाती घेऊन दांडूका-काठी ॥३॥
देवाच्या नावाने राक्षसघात
मुक्या प्राणिमात्रांचा बळी,
नवस, उपवास, जोगवांती
सुबुद्धीलाही दुर्बुद्धी छळी ॥४॥
अन्यायाला वाचा फोडूनी
पेटवा ह्या अनिष्ट रुढींना,
विज्ञानयुगात जरा वावरा
वाचवा हो पुढच्या पिढ्यांना ॥५॥