माझी अर्धांगिनी
माझी अर्धांगिनी
होता न आले राम मला तरी वनवास मी भोगिला
सीता बनूनि सखे मजसवे तू ही तोच साहिला
सप्तपदी चालता मजसवे हात धरूनिया हाती
प्रतिज्ञेस आचरिले बनूनि जन्मभर सांगाती
पिता तुझा जनकापरी, राजा गडगंज संपत्तीचा
परी न वाहिला भार जराही कधी तू गर्वाचा
कष्टविले देहास आपुल्या प्रिये, तू रात्रंदिनी
सावरला गरिबीत प्रपंच हा बनोनि अर्धांगिनी
उणे, दुणे या प्रपंचातले तू झाकूनिया ठेविले
दोषांना पदरात घालूनि काय बरे मिळवले?
लाऊनिया खांद्यास खांदा, कटी पदर खोचूनि
दुःखास देण्या तोंड, प्रसंगी बनलीस रणरागिणी
गुणांचा खजिना तुझ्याकडे आणलासे कोठोनि
लवकुशासम मुले घडविली संस्कार ते देऊनि
सुनांना मुळी सून म्हणोनि कधी न वागविले
आई बनोनि, मुलींप्रमाणे त्यांना तू सांभाळले
भाग्यवान मी मला लाभली भाग्यलक्ष्मी गुणी
"जन्मोजन्मी हीच मिळू दे" प्रभू तुला मागणी