STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

हात तुझा माझ्या हाती

हात तुझा माझ्या हाती

1 min
41.3K


हात तुझा माझ्या हाती

सोपविला कसा कोणी

आली आनंदे चालत

लक्ष्मी तुझ्या पावलांनी।।१।।


हात तुझा माझ्या हाती

झाले गणगोत गोळा

तुझ्या माझ्या बंधनाचा

झाला आनंद सोहळा।।२।।


हात तुझा माझ्या हाती

देता माय सुखावली

कळ विरहाची तिनं

काळजात लपविली।।३।।


हात तुझा माझ्या हाती

दिला किती आनंदानं

बाप तुझा दाता थोर

केलं त्यानं कन्यादान।।४।।


हात तुझा माझ्या हाती

देता नेत्र पाणावले

काळजाचे पाणी पाणी

मन त्यांचे हेलावले।।५।।


हात तुझा माझ्या हाती

भासे मऊ ऊबदार

संकटात वाटतसे

माझ्या जीवाला आधार।।६।।


हात तुझा माझ्या हाती

क्षण क्षण आनंदाचा

वाटे हलका जीवाला

भार साऱ्या संसाराचा।।७।।


हात तुझा माझ्या हाती

उजळली भाग्य रेषा

दुःख, दैन्य सारे माझे

गेले दूर दाही दिशा।।८।।




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational