शबरी
शबरी
शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी
चिलीपिली तिच्याभवती गोंगाट करत भारी
टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी
म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी
जशी जशी भवताली पोरं होत गोळा
तसतसा हरखुन जाई तिचा जीव भोळा
‘चार आण्याला मूठभर’ भाव होता रास्त
विकत घेण्यापेक्षा पोरं चाखून बघत जास्त!
कुणीतरी सांगे ‘तिचा परदेशात असतो लेक
दर महिन्याला पाठवतो दहा हजारांचा चेक !’
गुरुजींनी विचारलं एकदा ठरवून काहीतरी
‘बोरं का विकता? रग्गड पैसा आहे ना घरी ?’
हताश हसून ती म्हणाली ‘काय सांगू लेकरा तुला,
गोजिरवाणा एक नातू बी आहे परदेशात मला...
...पण अजून तरी मी त्याला पाह्यलेलं नाही
माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही
...म्हणुन मी शाळेपुढं बोरं विकते अशी
न पाह्यलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी !’
म्हातारीच्या ममतेचा चेक सांगा कधी वटेल...?
बोर वाळली दारातली...! तिला नातू कधी भेटेल ?