थेंब भिजका क्षण
थेंब भिजका क्षण


भलत्याच वेळी कधीतरी तुझी ओलसर आठवण येते,
लाख विसरायचं म्हणतो पण ती पावसात हटकुन येते.
अग म्हणे तू त्या चंद्राकडेही बघत नसतेस आजकाल
चांदण्यानीच सांगितले पाहून तुझा अश्रू भिजला रुमाल ,
तसे मीही विसरण्याचे येथे धुंडत असतो लाख बहाणे,
पण आवर्जून आठवते बघ पावसाचे ओलेचिंब गाणे.
नाही म्हंटल तरी थोडा वारा चिमटीत धरून ठेवलाय,
तुझ्या श्वासाच्या सुगंधा ऐवढा पाऊस जपून ठेवलाय.
बर सांग पाऊस अनावर होऊन पडतो की ढग रडतो,
थेंब भिजला क्षण कोणत्या हळवेपणाने पानातून झरतो.
जाऊ दे काही गोष्टी चिंब भिजूनही मी सांगणार नाही,
भिजल्या मनाने तुला ते सारं पुन्हा मुद्दाम आठवणार नाही.
झालेच तर एखादेवेळी कधी एकांताचे डोळे पुसून बघ...
अंगावर पाऊस येण्या आधीचा मंद गारवा झेलून बघ.....
खरच अस सर्व शब्दात म्हणून सांगता येत नसत बाई
तुला म्हणून सांगतो ढगात पाणी उगाच साचत नाही.
तशी तू आताशा चिंब पावसात भिजत नाहीस हे खरं का ?
पण माझ्या डोळ्यात आठवणीच आभाळ दाटतय बर का ?