रस्ता
रस्ता
निर्मनुष्य झालेत सारे रस्ते
प्रवास थांबला आस्ते आस्ते
मनात भीतीचे घर वसते
जगणे अवघड मरण सस्ते.
गजबज कुठली नाही आता
एकटा पडलाय रोजचा रस्ता
सोसतोय चटके एकटा एकटा
वाट पाहतो केव्हा होईल राबता
आयुष्य अवघे झाले समांतर
जगण्या- मरणात वाढले अंतर
मार्ग असूनही नजर मात्र धुसर
धावणे सोडा चालणेही दुस्तर.
जरा सोसूया या साऱ्या खस्ता
चालू लागेल पुन्हा हाच रस्ता
संयम आपल्या हृदयात असता
निघेल मार्गही मग हसता हसता.