आठवणी
आठवणी
आठवणींचा पसारा काही केल्या मनातून आवरला जात नाही ,
का छळतात भूतकाळातल्या आठवणी हे कोडेच उलगडत नाही !
रणरण तापलेल्या मनात कधी पावसाची सर बनून बरसतात ,
तर कधी आपल्या अस्तित्वाची ऊब ती मनावर पांघरतात !
आठवणींच्या लाटांना ठाऊक असते केवळ लहरत जाणे ,
मागे सोडून आलेल्या सुगंधी कळ्यांना पुन्हा फुलवून घेणे !
कधी आठवांची ही नक्षी असते हसरी , खेळती , नाचरी ,
तर कधी हीच स्मृतींची रांगोळी वाटते जीवघेणी अन् बोचरी !
वाटते कधीतरी निघून जावे या बोचऱ्या आठवणींपासून दूरदूर ,
परंतु मनाच्या खोलवर दाटून राही एक अनामिक हुरहुर !
हा आठवांचा गुच्छच तर आहे माझ्या असण्याचे अन् हसण्याचे कारण !
मम जीवनाच्या मोदकात ठासून भरले आहे या आठवणींचेच तिखट गोड सारण !
