श्रावण आठवणी
श्रावण आठवणी
आला पुन्हा तो श्रावण प्रत्येक स्त्री पाहते ज्याची आतुरतेने वाट ,
जिवलग सखा तो श्रावण येता मनाच्या कालव्यात वाहती स्मृतींचे सुगंधित पाट
आठवतो तो माहेरचा श्रावण सोमवार अन् आईसोबत पुजलेला हर ,
भोळ्या सांबाच्या भक्तीची वाहत असायची अंतरंगातल्या सागरात लहर !
मंगळवारी सुवासिनींच्या सवे लुटायची मंगळागौरीची मजा ,
नानाविध खेळांच्या क्रीडा करता आनंदून जायचा जीव माझा !
शुक्रवारी करून जिवती पूजन आई अर्पायची तिला चणे फुटाणे अन् खीर ,
लेकरांची निगा राख माते , असे म्हणताच आपसूक आईच्या नेत्री यायचे नीर !
नागपंचमी येता उरात वेगळीच धडकी भरायची ,
ताकीद होती आई अन् आजीची विळीवर काहीही न चिरायची !
पुरणाची वाफाळती दिंडे त्यावर साजुक तुपाची धार ,
स्वर्गीचे अमृत जणू प्राशन केले असा व्हायचा साक्षात्कार !
रक्षाबंधन समीप येता दादाकडून काय मिळेल याची असायची उत्सुकता ,
सजवायची औक्षणाची थाळी दरवर्षी आणून नवी कल्पकता !
बालमनात जपून ठेवलेला हा श्रावण आठवून अंगी जणू सुखनैव मोरपीसे फिरतात ,
अन् काळजाच्या जमिनीत ह्याच सुगंधी आठवणींची अलवार पिंपळपाने होतात !
