आमची सुवर्णनगरी
आमची सुवर्णनगरी
त्या नवीपेठच्या गल्ल्या ते गोलाणी मार्केट,
ती भव्य सतरा मजली उरात धडकी भरवते थेट !
त्या गणपतीच्या मिरवणुका तो निवांत मेहरूण,
आठवता माझं जळगाव चित्तवृत्ती उठतात मोहरुन !
बालपणाच्या स्मृती जपलेलं ते गांधी उद्यान
नवीपेठचा रास गरबा म्हणजे जळगावची शान !
तो तरसोदचा रम्य परिसर ते गणरायाचे सुंदर देऊळ,
मनातल्या कोलाहलाला पूर्णविराम देणारे हेच ते राऊळ !
त्या राजमल लखीचंद अन् बाफनाच्या भव्य सुवर्णपेढ्या,
त्यांनी घडवलेले रेखीव दागिनेच परिधान करत आल्या इथल्या कित्येक पिढ्या !
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात अन् इथलं सोनं घेऊन जातात,
अनेक लेकीबाळी विवाहात इथल्याच सोन्याला प्राधान्य देतात !
ते टॉवरचं घड्याळ ती जोगळेकरची कचोरी,
आकर्षक फुले मार्केट मधले ते छोटे मोठे व्यापारी !
साजशृंगार,गृहसजावट,वस्त्रप्रावरणे सगळेच इथे मिळते,
बदलत जाणारी फॅशन इथे खरेदी करणाऱ्या प्रत्येकाला कळते !
सत्तरीची असो नार किंवा असो पाळण्यातील बाळ,
प्रत्येकाचीच जुळली आहे या बाजाराशी अतूट नाळ !
सणावारी तर भरते इथे जणू जिल्ह्याची जत्रा ,
सर्वत्र चालते इथे फक्त उत्साहाचीच मात्रा !
गौरी गणपती नवरात्र दसरा अन् दिवाळी
या दिवसांत तर असते खरी चैतन्याची मांदियाळी !
मनसोक्त खरेदी केल्यावर दिसते ती चंदुलाल रसवंती,
गारेगार रस प्राशन करून चैतन्याने मग उजळते कांती !
दिवाळीत आपली पावले आपोआप शिवतीर्थाकडे वळतात,
यंदाच्या वर्षी आलेले फटाक्यांचे नवीन प्रकार तेव्हाच कळतात !
भव्य त्या मैदानावर अनेक लहान मोठे मंडप सजतात,
भरपूर फटाके घ्यायचे बेत मनात रुजत असतात !
अमाप खरेदी झाली तरी लेवा बोर्डिंगचा सेल पाहूया,
छोट्या मोठ्या काही गोष्टी घेण्यासाठी तिथेच जाऊया !
दिवाळीनंतर फिरण्यासाठी बुकिंग आत्ताच करून घेऊ,
त्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्टेडियम कॉम्प्लेक्स फिरून येऊ !
बघता बघता संध्याकाळ झाली आता नेहरू चौकात जाऊ,
सतरा मजली खालच्या खाऊगल्लीत पेटपुजा करून घेऊ !
शतपावली करत करत आता निशेचे स्वागत करू,
आठवणींच्या गावात चांदण्या मोजत जागत राहू !
अशी आमची ही सुवर्णनगरी जिच्या आहेत अनेक खासियती ,
आधुनिकतेसोबतच जपल्या जातात इथे परंपरा अन् रीती-भाती !
