STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Drama Inspirational

3  

Vaishnavi Kulkarni

Drama Inspirational

ती आणि तिचे प्रश्न

ती आणि तिचे प्रश्न

2 mins
3

आज आले तर आहे मी माझ्या आईच्या गर्भात 

पण उद्या तिच्या कुशीपर्यंत पोचेन का ?


मायेच्या मऊ कुशीत पोचले मी देवा एकदाची 

पण बाबांचा प्रेमळ स्पर्श मला होईल ना ?


आज तर बाबाने चक्क दिवसभर मलाच धरून ठेवलं

पण उद्या अजून एखादा किंवा एखादी आली तरी माझे असेच लाड होतील का ?  


चला शाळेला जायची वेळ झाली लाडूबाई

पण शाळेत कुणी त्रास दिला तर त्याला मी धडा शिकवू शकेन ना ? 


कालपर्यंत होते आई बाबांची बाहुली, आज मी मोठी झाले

या चार दिवसांत होणारे माझे मुड स्विंग्ज सगळे समजून घेतील ना ? 


आजपर्यंत मी पाहिलेली स्वप्नं आता खरी होतील का ? 

दहावीच्या परीक्षेत मला मनासारखे गुण मिळतील ना ? 


पहिल्यांदाच चालले आहे मी आज बाबाला सोडून

हॉस्टेलला बाबासारख्या जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील का ?


सुटले बाबा एकदाची अन् मिळवली डिस्टिंक्शन मध्ये पदवी

पण आता लगेच माझ्या लग्नाचा घाट घातला जाणार का ? 


स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे मला, नाव कमवायचं आहे ,

पण मग ते करण्याच्या नादात माझ्या मागे दुसरं नाव लावणं राहून तर जाणार नाही ना ? 


पाहिलं मी त्याला..जणू स्वप्नातला राजकुमारच तो माझ्या,

पण त्याच्या पोटातून त्याच्या हृदयात जाणाऱ्या मार्गावर तो मला येऊ देईल का ? 


विश्वास बसत नाही, त्याला माझ्यात त्याची अर्धांगिनी दिसली,

पण त्याला भावले तशीच त्याच्या कुटुंबालाही मी भावेन ना ? 


वाढले ज्या घरात २४ वर्ष, आता २४ तासांत या भिंतींना मी परकी होणार , 

पण स्मृतींनी गंधाळलेल्या या वास्तूला वरचेवर माझे पाय लागतील का ? 


नव्या दुलईतला नवा संसार आता वास्तवाचे अस्तित्व बघणार

या नव्या वाटेवर मला काटे मिळू देत, पण फुलांचे ताटवेही मिळणार ना ?


त्याच्या माझ्या नात्याची वीण आता अजूनच घट्ट होणार, 

पण जसं माझं या जगात स्वागत झालं तसं माझ्या पोटी लेक आली तर तिचंही होणार का ? 


माझ्या अंगणातली चिमणी आता पुन्हा माझ्याच वाटेवर जाणार

पण मैत्र मेळाव्यात वावरणारी माझी सावली माझीच साथ सोडणार नाही ना ? 


जशी अनेक वर्षांपूर्वी मी आले, तशीच अजून एक माझ्या लेकाच्या आयुष्यात येणार

पण मला सासू न समजता मैत्रीण तिने समजावं अशी तर मी वागू शकेन का ?


कालपर्यंत जोडून ठेवलेली लेकीची नाळ आता दुसऱ्याच्या घराशी बांधावी लागणार

पण माझ्यातल्या आईचा पदर एकटाच मागे राहणार नाही ना ? 


आज नवी पदवी मिळाली मला जी दिली दुधावरच्या सायीने,

आता माझं आणि माझ्या दुसऱ्या लेकीचं नातं अधिक दृढ होईल का ? 


आताशा गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत, सगळंच बदललं

पण या बदललेल्या वातावरणात मला जुळवून घेता येईल ना ? 

थकत चालला हा देह आता, पैलतीर दिसू लागला

पण मागे राहिलेल्यांना माझ्या विरहातून सावरता येईल का ? 


परमेश्वरा, माणूस म्हणून घडून, माणूस घडवून तुझ्याकडे परत आले आहे

पण संस्कारांची शिदोरी वाटत राहण्यासाठी पुढचाही जन्म मला पुन्हा एकदा तू माणूस म्हणूनच देशील ना ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama