गेली दिवाळी
गेली दिवाळी
सरली दिवाळीची धामधूम जीव झाला थोडा निवांत
कालपर्यंत चिवचिवणारं घर एका क्षणात झालं शांत
वेध लागतील आता साऱ्यांनाच तुळशीच्या विवाहाचे
कसं बरं सजवाव वृंदेला म्हणून बेत रंगातील मनाचे
तुळशी - विष्णू विवाह साजरा झाला की मनी काहूर माजेल
दीपोत्सवाला आता निरोप द्यायचा म्हणून विरहाची वाजंत्री वाजेल
पणत्या, माळा आता पुन्हा कपाटात जाऊन बसतील
लोकांची आयुष्यं उजळवली म्हणून समाधानाने हसतील
दारांवराची तोरणे खाली उतरून एखाद्या कप्प्यात जातील
सुनं दार बघून मनात त्यांच्या आठवणींचे उमाळे येतील
रांगोळ्यांना मात्र तेवढा असेल देव्हाऱ्याजवळ रोज वाव
बाराही महिने माझं महत्त्व म्हणून उगाच खातील त्या भाव
आकाशकंदील बिचारा अंगाची मुरकुटी करून झोपेल
अकरा महिन्यांची विश्रांती त्याला कशी बरं झेपेल ?
आली दिवाळी अन् गेलीही दिवाळी देऊनी नवप्रकाश
दिवाळीने दिलेल्या ऊर्जेने आता नव्याने कवेत घेऊ आकाश
