आपला श्रावण
आपला श्रावण
हिरवाईचा साज लेवुनी सजली सारी धरती ,
नेत्रसुख देणारी अवनी पाहुनी येई आनंदाला भरती !
चोहोबाजू दिसते मजला सृष्टीचे लावण्य ,
जणू निसर्गाने दिधले धरेला अक्षय्य ते तारुण्य !
श्रावण म्हणजे ऊन पाऊस श्रावण म्हणजे झुला ,
श्रावण म्हणजे सुखांची हंडी श्रावण म्हणजे आनंदाचा काला !
श्रावण म्हणजे माहेरची सय जी आणते डोळ्यांत पाणी ,
श्रावण म्हणजे माहेरच्या पारिजातकाच्या मिठीतली गोड गाणी !
श्रावण म्हणजे शिव शंभो तर श्रावण म्हणजे मंगळागौर ,
श्रावणातल्या चैतन्याची मजाच असते काही और !
श्रावण गाणी गाताना दिसे समोर आठवणींचा पट ,
आयुष्यातील श्रावण म्हणजे अनुपम असा मधुघट !
श्रावण म्हणजे नानाविध व्रत वैकल्यांची पर्वणी ,
अनुभवता हा सुखद अन् रम्य श्रावण ,
जीवनी हिरवळीची होते पायाभरणी !
