आली दिवाळी
आली दिवाळी
येणार येणार म्हणता म्हणता पाहा ती आली,
अहो कोण काय विचारता तुमची आमची दिवाळी !
घर सजले,अंगण सजले आणि उल्हसित झाली मने,
दीपावलीच्या स्वागतासाठी नव्याने मोहरली सुमने !
तोरणे, माळा,पणत्या,पताकांनी सजल्या बाजारपेठा,
धन खर्चापेक्षा आहे तेजाळत्या जीवनांचा आनंद मोठा !
गेरूने सारवलेले अंगण आता पुन्हा एकदा प्रसन्न हसेल,
आयुष्याच्या रांगोळीत आता नवचैतन्याचा रंग वसेल !
घरोघरी आता तयार होतील फराळ अन् मिष्टान्नाची ताटे,
चमचमत्या प्रकाशाचे कवडसे पाहता नेत्री आनंद दाटे !
गाय गोऱ्हा, यम कुबेर अन् लक्ष्मीचे सर्वत्र होईल पूजन,
सुख समृद्धी वर्दी देता समाधानाचे चौफेर होईल कुजन !
सर्वत्र विजयश्री मिळो म्हणुन पाडव्याला होते पतीऔक्षण,
मनात रेंगाळती अशा वेळी एकमेकांच्या सहवासाचे हळवे क्षण !
बहिणीच्या घरी भोजन करता भाऊरायाची आपदा दूर पळे,
अशा पुनीत भाऊबीजेचे महत्त्वही तसेच आगळे वेगळे !
तुळशी विवाह संपन्न होता मग निरोप घेते ही आपली दिवाळी,
वर्षभर मात्र तिच्या आठवणींची मनात जागृत असते मांदियाळी !
