ओल्या वाटा
ओल्या वाटा
बरसल्या बेधुंद सरी
झाल्या ओल्या वाटा
खट्याळ वारा उडवी
माझ्या रेशमी बटा
ओल्या निमुळत्या वळणावर
मूक प्रेम फुलत जाई
होता नकळत स्पर्श ओला
वेडे मन भांबावून जाई
माझ्या ओच्यातील चाफ्याला
तुझाच जणू सुगंध सुटे
डोळ्यातील भावना वाचता
क्षणही तिथेच थांबावा वाटे
आपल्या चालत्या पथावर
पडे बकुळीचा मोहक सडा
वाऱ्याची शिरशिरी झेलता
सलज्ज जीव होई थोडा थोडा
हिरवळीचा गालिचा मखमली
पावलांना खट्याळ गुदगुल्या करी
पाखरांची मंजुळ शीळ ऐकता
प्रसन्नता भरून राहे उरी
मुक्यानेच मग बोलणे होई
तुडवताना ओले मोहक रान
डोळ्यांत हरवलेले डोळे पाहता
सृष्टीही विसरे आपले भान

