जीवननाट्य
जीवननाट्य


प्रेक्षकगृहात उभे केलेस देऊन कागद कोरा
रिक्त संहितेवरच मांडला नवनिर्मितीचा पसारा
शोकात्मिका सुखात्मिकांचा निव्वळ भास सारा
खेल खेळुनी उभारला हा पंचमवेद सुत्रधारा
बोचून शरीरा रुधिरशाईने अक्षरदेह उभारला
सुखदुःखाच्या द्वंदाचा जीवनाविष्कार मांडला
झाली का करमणूक की व्यर्थ होता कर्मयज्ञ
लोकरंजन तरी घडले ना पूस त्या प्रेक्षकां सुज्ञ
पहिल्या घंटेचा नाद अथांग पोकळीत हरवला
नांदी नंतरच्या जागृतीचा पाश आता तुटला
प्रेक्षक उठले नाट्य सरले अखेरचा खेळही सरला
आवेश ओसरला संहिता हरवली वेषही उतरला
सरली चंद्रसूर्याची प्रकाश योजना तिमिर पसरला
एकला मी फक्त तुझ्या अस्तित्वातचे भास सोबतिला
थकल्या पावली रित्या हाती चालता प्रस्थानाला
वसुंधरेच्या रंगभूमी शेवटी काळाचा पडदा पडला