हवे हवे बालपण
हवे हवे बालपण
जग जग जगताना बालपण रांधतो
रोज रोज खेळताना इथे डाव हरतो
घडी घडी आठवे मायेची ती कूस
उरी उरी उरला आता तिचाच सोस
कानी कानी गुंजती ती अंगाईगाणी
मनी मनी गुंफती आता हळवी विराणी
कण कण शोधतो स्पर्श ते मायेचे
क्षण क्षण हरवतो भास ते सयेचे
दाही दाही दिशांना वाट काही सापडेना
लाही लाही होताना आस मागली सुटेना
सुनी सुनी झाली ती भजनात गवळण
कानी नाही येत आता ओव्यांची गुंफण
जाता जाता गेली संगे आजीची कहाणी
गाता गाता विरली कशी भोंडल्याची गाणी
दिन दिन सरायचा सख्या सोयऱ्यासोबत
कंठ कंठ दाटतो आता आठवांच्या गर्दीत
नको नको हे वाढणे चालताना सतत धावणे
हवे हवे बालपण उड्या मारत नभात विहरणे
