माझी चिमणी
माझी चिमणी


आज माझ्या खिडकीवर,
एक चिमणी चिव चिव करत होती
तिच्या त्या मधुर आवाजात,
ती जणू मला काहीतरी सांगत होती ।।१।।
माझ्या घरात सुद्धा एक चिमणी राहते,
जिच्या गोड बोलण्याने ती सगळ्यांना आपलंसं करते,
शांत ती झाली की मात्र ,
घर कसे सुने वाटू लागते ।।२।।
माझ्या घरात सुद्धा एक चिमणी राहते,
चिमुकल्या पावलांनी ती घर भर धावत असते ,
जीव माझा मुठीत येतो जेव्हा,
धावता धावता ती बुदकन पडते ।।३।।
माझ्या घरातसुद्धा एक चिमणी राहते,
घरातली भांडी जिला तिची भातुकली वाटते ,
रिकाम्या कढईत चमचा ढवळत ,
जी सहज माझी नक्कल करते ।।४।।
माझ्या घरातसुद्धा एक चिमणी राहते,
जी बिस्कीट चकल्या कुडुम कुडुम खाते ,<
/p>
डोळे माझे दाटून येतात जेव्हा,
ती त्यातलाच एक घास मला भरवते ।।५।।
माझ्या घरातसुद्धा एक चिमणी राहते,
जी आपल्या बोबड्या आवाजात बालगीते गाते ,
टीव्हीवर आवडतं गाणं लागताच ,
हात हलवत छानसा नाचही करते ।।६।।
माझ्या घरातसुद्धा एक चिमणी राहते,
जी तासंतास मोबईलवर खोट्या गप्पा मारते ,
घराची बेल वाजली की ,
बाबा बाबा करत जी दरवाजाकडे पळते ।।७।।
पाहता पाहता खिडकीवरची चिमणी ,
निळ्या नभात उडून गेली ,
भविष्यातील त्या क्षणाची आठवण करून गेली ।।८।।
जेव्हा माझी चिमणी तिच्या घरी जाईल
हृदयात आमच्या तिच्या आठवणींचा डोंगर ठेऊन जाईल
मनात आमच्या तेव्हा एकच आशा राहील
ती जिथे जाईल सुखी राहील ।।९।।