देवकीनंदन गोपाला!'
देवकीनंदन गोपाला!'


बाबा,
तुझं खानदान धोब्याचं.
धोब्यानं भल्या घरची धुणी धुवावी,
चार घरच्या भाक-या गोळा कराव्या,
ढेबूजी जानोरकर वठ्ठी म्हणून नाव कमवावं
बायकापोरांचं पोट भरावं,
अन् खाऊन पिऊन सुखी रहावं.
पण तुला काय अवदसा आठवली,
कोण जाणे!
अंगावर रंगीबेरंगी चिंध्या अंथरल्यास,
धोतर सोडून जुनेर नेसलास,
एका कानात कवडी,
दुस-या कानात बांगडी,
डोक्यावर खापराचा तुकडा ठेऊन,
हातात काठी घेऊन,
नांदत्या घरातून बाहेर पडलास,
आणि नकळत.......,
मला सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या बुध्दाची आठवण देऊन गेलास.
म्हातारी आई,
तीन महिन्याची गर्भार बायको,
दोन चिमुरड्या लेकी.
काही, काही पाहिलं नाहिस तू.
एका क्षणात या साऱ्यांकडे पाठ फिरवलीस.
एक मुक्तात्मा मुक्त संचारासाठी निघाला.
लोकांच्या लाथा खाऊन त्यांना बाता शिकवणारा
एकमेव अवलीया तू.
गंगा बहती भले, साधू चलता भला.
अगदी तसाच तू चालत राहिलास,
वा-यासारखा रात्रंदिवस वाहत राहिलास.
टक्के टोणपे खात राहिलास,
भजन, किर्तन गात राहिलास.
हातात खराटा घेऊन अक्षरश: पन्नास वर्षे
इथले रस्ते झाडत राहिलास,
आणि शुभ्र पंचा नेसणा-या महात्म्यालाही
हातात झाडू धरायला लावलास.
नाहितरी जातीवंत धोबीच होतासना तू!
सकाळी गावातली घाण साफ करुन,
संध्याकाळी डोक्यातली घाण साफ केलीस
आणि भविष्यातल्या कित्येक शाम मानवांना प्रेरणा देऊन गेलास.
आयुष्यभर भाकरीचा शिळा तुकडा खाऊन खापरामध्ये पाणी प्यालास,
लुळ्या पांगळ्यांना कडेवर घेतलेस,
महारोग्यांना स्वत:च्या हाताने चांगलं चोळून, मोळून न्हाऊ माखू घातलेस
आणि कित्येक बाबा आमट्यांना जगण्याचा उद्देश प्राप्त करुन दिलास.
कुठलाही चमत्कार न करता स्वत:च एक चालता बोलता चमत्कार झालास.
तुझं किर्तन ऐकून,
आचार्यासारख्या शब्दप्रभूनेसुध्दा तोंडात बोट घालावे,
प्रबोधनकारासारख्या तर्कतिर्थानेसुध्दा तुझ्यासमोर नतमस्तक व्हावे,
धर्मांतराच्याबाबतीत संविधानकारानेसुध्दा तुझा शब्द प्रमाण मानावा,
खरच इतका का तू महान होतास?
बाबा, आज तू हवा होतास.
ताडकन उठला असतास आणि अयोध्येला जाऊन कारसेवकासमोर भजनाचा गजर सुरु केला असतास,
प्रश्नांची झड सुरु झाली असती...!
कारसेवा झाली का?
झाली बाबा.
मंदिरातला राम दिसला अन् रस्त्यावरचा दिसला का?
नाही बाबा.
अरे, असे कसे आंधळे झाले तुमी?
एवढ्या लांबून राम मंदिर बांधायले एयर कंडिशन रथयात्रा घेऊन आले......
आणि तुम्हाले तुमचे दारात उभे राहिलेले राम दिसले नाही?
दारात उभे राहिलेले राम ठनाना करते,
खपाटी गेलेले पोट, हातापायाच्या काड्या,
तेला भूक लागलेली असते,
ते भाकरीसाठी गयावया करते,
तेला हाकलून देता......
अन् खुशाल इथे रामाचे मंदिर बांधायले येता?
भल्ले लबाड गडी तुमी!
रामजन्मभूमी इथे नही बाप्पा.
ती तर नवकोटी दीनदलित जनतेच्या र्हिदयात आहे.
जे का रंजले, गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले,
तुका म्हणे सांगू किती,
तेची भगवंताची मुर्ती.
भूकेल्याले अन्न द्या, तान्हेल्याले पानी द्या.
यापरते दुसरे पुन्य न्है.
उपास तपास कराल, पुन्य न्है,
तासंतास देवाची पूजा कराल, पुन्य न्है,
कारसेवा कराल पुन्य न्है,
बाबरी मशीद तोडाल, पुन्य न्है,
राम मंदिर बांधाल, पुन्य न्है.
तुका म्हणे जन्म गेला,
शिला वाहता, वाहता मेला.
असं म्हणून तू दोन हाताने टाळ्या वाजविल्या असत्यास,
बेभान होऊन नाचला असतास,
आणि मग तू तुझ्या आवडीचं भजन बोलला असतास.............,
गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला.