हूंदका
हूंदका
हात लाडकीचा हाती
माय बापाचा आसरा
जनू गोठ्यामधी गाय
जशी हंबरे वासरा ।।
हात लाडकीचा हाती
मह्या काळजाला घोरं
जाय परायाच्या घरी
होय माऊली उदारं ।।
हात लाडकीचा हाती
माय हितगूज सांगे
राघू मैनाची रे जोडी
दान चुड्याला रे मागे ।।
हात लाडकीचा हाती
बाप करी बोळवण
घाली तुळशीला पाणी
माय बघते वळूण ।।
हात लाडकीचा हाती
बाप मनामधी रडं
माझं लाडाचं लेकरु
कसं राहीन रं सडं ।।
हात लाडकीचा हाती
बाप पुसतोया डोळा
धरी दाबून हूंदका
कसा येतो कनवळा ।।