पक्षांतर लिला
पक्षांतर लिला
इच्छुकांची संख्या फार |
किती करावे मोठे दार |
ऐका पक्षांतराचे सार |
ध्यान देवोनी ||
वाट चुकलेली काही मुले |
अती गोंडस मोहक फुले |
पाहोनी दार सताड खुले |
लागली घुसू ||
जत्रेत हरवली होती काही |
ठावठिकाणा लागला नाही |
शोधल्या आजवर दिशा दाही |
ती येथे गावली ||
सोडला काहींनी ‘हात’ |
म्हणे नाही ‘जीव’ त्यात |
;">कमळ आणि धनुष्यात |
लाल लाल पायघड्या ||
कोणी म्हणे ‘घड्याळ’ बंद |
म्हणोनी पक्षांतराचा छंद |
चाखण्या सत्तेचा गुलकंद |
भुंगे लागले ‘फिरू’ ||
प्रस्तावना ही काही थोडी |
वाचण्याची ठेवा गोडी |
सुटतील सहज अनेक कोडी |
पुढल्या अध्यायी ||
सांगतो मुरारी काव्यरुपात |
कोण जात्यात आणि सुपात |
आणखी कोण साजूक तुपात |
ऐक बा रसिका ||