संकल्पाची गुढी उभारू
संकल्पाची गुढी उभारू
वसंत आला उठा झडकरी नव वर्षाची गुढी उभारू।
आळस झटका नवीन स्फूर्ती चैतन्याची गुढी उभारू।।१।।
लिंबाचा तो कडवट पाला सार सांगतो आयुष्याचे।
अनेक आले प्रसंग दुःखे तरी सुखाची गुढी उभारू।।२।।
आंब्याच्या पानाचे तोरण दारावरती नवीन बांधू।
समाधान सुख शांतीच्याही आगमनाची गुढी उभारू।।३।।
साखर गाठी गुढीस बांधू आयुष्याला गोड करू हो।
अवीट अमोल संसाराच्या त्या गोडीची गुढी उभारू।।४।।
वैर पुरातन द्वेष दुश्मनी पानगळीसम गळून जाई।
नवी पालवी माया ममता वात्सल्याची गुढी उभारू।।५।।
सुख दुःखाची सांगड घालू जगू सुखाने जीवन सुंदर।
गीत सुखाचे सदैव गाऊ प्रसन्नतेची गुढी उभारू।।६।।
प्रेमच देऊ एक दुज्याला वाणी मध्ये भरू गोडवा।
प्रत्येकाचा देव जागवू संकल्पाची गुढी उभारू।।७।।