दुष्काळ
दुष्काळ
हरवला पावसाळा,नाही संपला उन्हाळा,
पावसाच्या थेंबाची,तहान लागली ढेकळा.
पावसाची पाहून वाट,झाले काळजाचे पाणी,
कोरड्या मातीत, केली साऱ्यांनी पेरणी.
नाही प्यायला पाणी, गुराढोरांना चारा,
कशी पेटवावी चुल,डोळा लागल्या धारा.
नाही जगणे सोपे, डोळा मरणच दिसे,
खावे काय पोटाला,दाना घरामंधी नसे.
पडला आतडयाला पिळ,आली घशाला कोरड,
आईच्या मांडीवर, उपाशीच बाळ रडं.
हंबरती गाय इथे, मेलेल्या त्या वासरांना,
वाटे जगवावं पिलांना, एक-एक चारुन दाना.
उन्हाच्या कडाक्यानं, करपले कोवळे मोड,
मानसांना गिळायला, ऊभा दुष्काळ हा पुढं.
कसा आला दुष्काळ, झाले जगणे कठीण,
इथे प्रत्येकाला दिसे,ज्याचे त्याला मरण.
गावोगावी शिवारात, भटकंती पाण्यापाई चाले,
पाय पाहून रक्ताळले,डोळेच झाले ओले.
नाही जगण्याची आस,नाही जगण्याचे बळ,
आला मरण घेऊन दारी,घरोघरी दुष्काळ.
केवीलवानी वासून तोंड,भुके मरती पुष्कळ,
म्रत्यूचे थैमान घाली,इथे भयाण हा दुष्काळ.
घरोघरी हंबरडा, पोट पाटीला हे भिडले,
अन् व्याकूळ भुकेने, जीव त्यांनी सोडले...