वसंतागमन
वसंतागमन
उदास वदने बसली होती रानी वनी वनराणी
झुळझुळत ती झुळूक आली हळूच लागली कानी
त्या झुळकीने कुणास ठावे निरोप काय दिधला
वनराणीचा मोर मनाचा थुई थुई नाचला। ।।१।।
पंख फडकवित कुठून तरी तो आलासे कोकीळ
बसून डहाळीवरी तरुच्या पानाशी घाली शीळ
सुमधूर ती शीळ ऐकता पानेही थरारली
कुणास ठाऊक कोकीळाने वार्ता काय दिधली ।।२।।
करत गीत गुंजन भिरभिरत ते फुलपाखरू आले
या पुष्पाहून त्या पुष्पावर स्वैरपणे फिरले
कानमंत्र तो काय दिलासे पुष्पालाच ठावे
शहारल्या पुष्पाशी वाटे आपणही गावे ।।३।।
नित्य नवे ते बदल घडतसे पहा निसर्गात
सळसळते चैतन्य, जेधवा येतसे वसंत
निसर्गाची ही किमया सारी का न दिसे नयना?
सुज्ञ मानवा, बुद्धी चालवी होई आता शहाणा ।।४।।
करत उद्याची चिंता कारे बसशी कोमेजून?
सुख येतसे दुःखामगून रात्री नंतर दिन
जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत
घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वसंत ।।५।।