पावसाळी सकाळ
पावसाळी सकाळ
सर पावसाळी होती ओलेती- ती रात, बरसत होता बाहेर, पाऊस तो जोरात, झोपलो होतो गाढ मी,दडपून पांघरूणात, अचानकच ती आली माझ्या स्वप्नात.
अन कुजबुजली हळूच माझ्या कानात, "भेटूयात का रे सकाळी आपण एकांतात,? "बोलायचे होते काही, राहीले जे मनात, वाट बघीन तुझी..., टेकडी शेजारच्या वनात.
रेनकोट आणि छत्रीही नको कुणी.. तिसरे आपल्या दोघांत, आश्चर्याने विचारले, "पण एवढ्या पावसात?"मंद मंद हसली ती अन निघूनही गेली, आली तशीच अकस्मात.
ताडकन बसलो उठून, झाली होती पहाट, स्वप्नाचा विचार घाली, पिंगा माझ्या डोक्यात,कोण होती ती.. येईना कसं ध्यानात? चेहरा देखील तिचा नाही राहीला लक्षात.
खिडकीतून जरा डोकावून पाहिले अंगणात, रातसार पडून पाऊस, झाला होता शांत, काळजी म्हणून जरा बघीतले, वरती आभाळात, दाटून मात्र भरले होते पाणी काळ्या ढगात.
विना छत्री-विना कोट निघालो, वनाच्या वाटेने वर्दळ तशी कमीच होती आज, नेहमीच्या रस्त्याने, बेचैन होतो मीही मनात, पावसाच्या भीतीने, वेडावले होते मन, रात्रीच्या त्या स्वप्नाने.
जाऊन पोहोचलो मात्र वनी ठरल्या ठिकाणी, एकटाच होतो मी, नव्हते दुसरे तेथे कोणी, केकारव मोरांचा छान, पडत होता कानी, अन ठेका धरत होते, पानांवरून निथळणारे पाणी.
वातावरणात जाणवत होता चांगलाच गारवा, मधूनच एखादा घुमत होता, खट्याळ पारवा, पंचम सोडून कोकीळ लावत होता स्वर एक नवा, उडण्याच्या तयारीत होता, इवल्या चिमण्यांचा थवा..
हसू आले उगाच तेव्हा, माझेच माझ्या मनी, स्वप्नावर विश्वास वेड्या ठेवत का रे कुणी, सांगू नकोस कुणासही, तुझी ही कहाणी, बघ दिसतेय तरी का कुठे, तुझी स्वप्नातली राणी.?
अचानक वाढू लागला, सभोवती अंधार, ओले-मंजूळ कानी, पडू लागले स्वर, सहजच आकाशाकडे गेली माझी नजर, अन आवेगात झेपावली, माझ्याकडे एक सर.
वर्षावात त्या प्रेमाच्या भिजलो मी.. नखशिखांत, माझीच मला राहीली ना जराही भ्रांत. हवाहवासा मज वाटू लागला, ओला तो एकांत बेचैनी मनातील धुवून गेली, झाले सारे कसे शांत..!!
पाठशिवणीचा मग रंगला छान आमचा खेळ, खेळ बघता आनंदे.. वारा घालू लागे शीळ, कळलेच ना मज,.. सोबत तिच्या कसा गेला वेळ, स्वप्नाच्या आता रात्रीच्या, लागत होता मेळ.
कानी पडले माझ्या, ओले तिचे शब्द, कसे रे तुम्ही सारे प्रपंचाच्या, चाकोरीत बद्ध, पावसात भिजण्याचा कधी घेत जा ना आनंद, आठवून ते बालपणीचे, हट्ट आणि जिद्द.
ठेव जपून बालपण, मनाच्या एका कोपर्यात, स्वच्छंदपणे कधी न्हात जा ना माझ्या वर्षावात, क्षण गेलेला पुन्हा न परती, कधी जीवनात,शब्द माझे ठेवशील ना रे, जपून ह्रदयात!
बंद डोळ्यांपुढे झरकन आली, स्वप्नातील ती नजर, चेहरा ही मग स्पष्ट झाला, कानी पडता तिचे स्वर, रोमांच फुलले आनंदाचे, ओल्या सर्वांगावर, निरोप घेवून निघून गेली सर सर.. आली तशी ती 'सर',
क्षणार्धात मग आश्चर्याने आलो भानावर, पाठमोरी जाताना 'ती' दिसली.. जीवा लावून हुरहुर. स्वप्न पहाटेचे माझे, झाले होते खरं,..
स्वप्नातली तीच 'ती' होती पावसाची सर..!!
