||तादात्म्य ||
||तादात्म्य ||
कोकणातले घर एक कौलारू, वेढती ज्यास वेली अन कल्पतरू,
बघताच मज शब्द लागले स्फुरू, वर्णन किती अन कसे करू |
दिसे समोरच अथांग सागर, आहे फक्त हाकेच्या अंतरावर
डौलात उभे दर्या किनाऱ्यावर टुमदार सुंदर कौलारू हे घर.|
बसून येथल्या ओसरीवर, न्याहाळतो मी रत्नाकर,
भेटण्या वसुधेस ऐसा भासे, तो अधीर, जैसा उतावीळा असे कुणी प्रियकर.|
लाटांमागून लाटा उसळती, जलधीची उत्कटता दाखवती,
भरून ओंजळीत शिंपले - मोती, भेटच जणू अर्णवाची, धरेस त्या अर्पण करती.|
पाण्यात पयोधीच्या भिजलो चिंब, अर्धांगिनीस घेऊनी संग,
बघता संधेचे लोभस सूर्यबिंब, ओंजळीत ते घेण्यात दोघे आम्ही दंग. |
क्षितिजावरची रंगांची उधळण, मोहवून गेली माझे मन,
आनंदाची ही सुगंधी शिंपण, पुलकित करून गेले जीवन.|
विसावलो हिरवळीवर येथील निवांत, झाले मन कसे शांत शांत,
लाटांच्या रवाने हरवली भ्रांत,गालामध्ये हासत होता, नभी मात्र निशीकांत.|
पहाटेच मग आली जाग, ऐकून मधूर संगीतमय आवाज,
चढवत होते कुणी... सुंदर साज अरे ही तर समुद्राची गाज !!
वाटले त्यात सूर आपण ही मिसळावा, लावला स्वर मी, सत्वर घुमवीत पावा,
श्रवणास तरूवर बसला येऊन रावा,दूर कुठेतरी घूमू लागला पारवा.|
बासरीवरची ऐकता ती भूपाळी, निद्रा चराचराची चाळवली,
निसर्गाने दिली दादरूपी टाळी, तादात्म्य त्यात पावलो... लागली ब्रम्हानंदी माझी टाळी.||
