नारी शक्ती
नारी शक्ती
यश शिखरे मी किती गाठले
आसमंत सारे कवेत घेतले ||
मर्दानी झाशीची मी..
प्राणपणाने फिरंग्यांशी लढले |
पद्मिनी मी सन्मानासाठी..
गनीमांस जरा न बधले ||
मी भवानी मीच ती आदि शक्ती '
आदिमाया मी, दुर्गा मी, मीच शिवाची पार्वती |
मीच अहिल्या अन फुल्यांची सावित्री
मीच शिवबाची जन्मदात्री ||
माता बनून घेते हाती..
पाळण्याची मी दोरी |
संस्कारते घड्यास जातीने,
कारणे जग उद्धारी ||
कल्पना मी, मीच सुनीता,
कमला ही मी अन मी स्वाती मोहन |
कर्तृत्व साता समुद्रापार, गाजवून
भारतवंशाची ठेवली मान उंचावून ||
तिमीर नाशून प्रकाश पेरण्या,
पेलते मी आव्हाने किती तरी |
नच होते मी दीन, न आहे अबला..
असे सबला मी आजची नारी ||