पुस्तक
पुस्तक
अरे, कोण आहे मी?
तू मला नाही ओळखलं?
मी पुस्तक, तुझा मित्र-सखा
बोट धरून तुला शिकवलं!
नामनिराळं रूप माझं
ज्ञान जगी मी पेरतो;
पण मी दिलेले विचार
तू कुठे दडवतो?
फाटलो, जीर्ण झालो तरी
भूत-भविष्याचा वेध घेतो;
"ग्रंथ हेचि गुरू" म्हणतो
तरी गैरकृत्य का करतो?
नेहमी तुला साथ देतो
ज्ञान देऊनी विज्ञान घडवतो;
"गरज सरो वैद्य मरो" या
म्हणीसम मला कोनाडी फेकतो
जे जे जवळ करी मला
तयांना सन्मान मिळतो;
सद्गती न मिळे तयाला
जो माझा अव्हेर करतो!
"वाचू आनंदे-राखू आनंदे"
हेचि माझे तुला सांगणे;
"वाचाल तर वाचाल" येणेप्रमाणे
असावे तुझे जगणे...
