चार कविताः चार स्तर
चार कविताः चार स्तर
मी
तिला म्हणालो
बाळा झाडाशिवाय फांदीला
फुले फळे येत नाहीत
तेव्हा
ती
म्हणाली
पप्पा
फांदीपेक्षा
वेलीला येतात फुले फळे
फुलतात
बहरतात
एवढंच काय
वेलीला स्वतंत्र अस्तित्व असतं
स्वायत्ततेचंं..
झाडाशिवाय वाढू शकेल का ही?
हे म्हातारं मन घाबरतंय
जंगलाला..
२
ती
सापडेल
किंवा सापडणारही नाही
कवितेच्या वहीत रक्त उतरलंय
त्याचं काय करू..
ओळी भिजल्या असतील
शब्दही थिजले असतील
कुठे ओघळ दिसला
की समजा
>
तीच
उगवून
आलीय
कवचकुंडलासह..
३
ती
म्हणाली,
'तू जळत जातो
अन्
मी
वितळत जाते
तुझं जळणं
आणि
माझं वितळणं
एवढंच अंतिम सत्य नाहीय रे
मरेपर्यंत अंधाराचं साम्राज्य माजू नाही दिलं
हे मूल्य आपण जपलं..'
ती शांत झाली
आणि मी मान टाकली...कायमची..
४
कुठे उडून गेला
पाण्याचा स्रोत
बिघडून गेला
जमीनीचा पोत
झोपेच्या झोपाळ्यावर
झोप पतंग झाली
हृदयाच्या वळणावर
रात रवंथ झाली...
@रवींद्र..