वेताळांचा राजा
वेताळांचा राजा


विक्राळ पसरला प्रांत विखारी माझा
मी तिमिर धुरंधर वेताळांचा राजा
भयक्रांत शांत ही थांबुन जाते धरती
आक्रोश हुंदके नुसते नावापुरती
लागतो मला तो किंकाळयांचा वाजा
मी तिमिर धुरंधर वेताळांचा राजा
घेऊन हिंडतो सोबत अपरा शक्ती
कैफात भुतावळ माझी करती भक्ती
नैवद्य हवा मज देह कापुनी ताजा
मी तिमिर धुरंधर वेताळांचा राजा
भस्मास लाविले स्मशानातल्या भाळी
नेसली वस्त्र ती अंगावरती काळी
शृंगार आवडे मला रक्त मासांचा
मी तिमिर धुरंदर वेताळांचा राजा
मी ओठांवरती हास्य ठेवले क्रूर
तांबूस जाहले नेत्र नशेने चूर
ऐकून नाव थरकाप सुटे सर्वांचा
मी तिमिर धुरंदर वेताळांचा राजा
सिंहासन केले प्रेतांचे मी खास
हातात खडग अन खांद्यावरती फास
बेताज बादशा मी तो पाताळाचा
मी तिमिर धुरंदर वेताळांचा राजा