मांगल्याचे थवे
मांगल्याचे थवे
रात्रीच्या गर्भात आज का कुजबुजती काजवे
उदास झाले झाडावरती का रडती पारवे
कधी भेटले मला पुरेसे कधी वाटले हवे
लुकलुकले अन सांगत गेले प्रकाशलेले दिवे
वाट पाहते वात ओलसर विश्वासाची मनी
संस्काराची ज्योत पेटली करते ओवाळणी
ज्ञानदिप हा अखंड तेवत राहो सर्वासवे
लुकलुकले अन सांगत गेले प्रकाशलेले दिवे
परदुःखाने डोळ्यांमधुनी थेंब कुणी गाळले
झोपडीतल्या काळोखाला सांग कुणी जाळले
बळ लाभावे नव्या पिढीला रोप लावले नवे
लुकलुकले अन सांगत गेले प्रकाशलेले दिवे
पणती व्हावी या देहाची उजळाव्या दशदिशा
पहाट व्हावी माणुसकीची जावी संपुनी निशा
सर्व जगावर सदा उडावे
मांगल्याचे थवे
लुकलुकले अन सांगत गेले प्रकाशलेले दिवे
