शब्दाअर्पण
शब्दाअर्पण
आजन्म सोसली दुःखे स्वातंत्र्य भारतासाठी
मी अर्पण करतो ओळी त्या अमर हुतात्म्यांसाठी
संसार त्यागला त्यांनी देहाची समिधा केली
यज्ञात नाचुनी ज्वानी नवसूर्य देउनी गेली
रणवीर धुरंधर गेले सोसून मस्तकी वार
स्वातंत्र्य देश करण्याला सोडले सर्व घरदार
घेतला वसा लढण्याचा
जयघोष गुंजला ओठी
समशेर उचलली हाती घायाळ उपाशी पोटी
ठेउनी मुखी हास्याला चढले जे फासावरती
रक्ताने भिजवत केली पावन देशाची धरती
हातात तिरंगा होता जय भारत ज्यांच्या ओठी
सोडल्या कधीना ज्यांनी त्या देशभक्तिच्या गाठी
रोमांच स्फुरावे अंगी स्मरताच क्रांतिची गाथा
डोळ्यात तिरंगा येतो टेकतो त्यापुढे माथा
झेलली उरावर गोळी सौख्यास ठेउनीपाठी
बलिदान पाहुनी ज्यांचे थांबला इथे जगजेठी
