कृष्णा
कृष्णा
कृष्णा,
बरेच दिवस बोलायचे होते
मनात साचलेले सांगायचे होते ,
एक मात्र लक्षात ठेव
रागावू नकोस ,मनात किंतू धरू नकोस,
जरा विचार केलास तर कळेल तुलाच,
तुझेच मन व्यक्त होत आहे आज
माझे विचार बनून
खरे सांगायचे तर ....
मला कधीच वाटला नाहीस तू
खोडकर,माखनचोर,किंवा चितचोर
तुझ्या प्रत्येक कृतीतून देत होतास तू
येणाऱ्या भयंकर युगाची जाणीव
कशी फेडली जातील वस्त्र घरी दारी
आणि उघडी पडेल आपलीच नारी
तिचीच माणसे तोडतील तिचे लचके
आणि करतील मनावर आघात..
आपलेच दोस्त ,यार , मित्र
कसे एकमेकांवर कुरघोडी
करतील आणि लोणी पळवतील,
संगनमताने कसे चढवतील
आणि पाडतील ही खाली
दाखवले तूच आम्हाला
कौटुंबिक जिव्हाळ्याची
दोरी क्षणात तोडून
जातील लेकरे लांब निघून
कधीही मागे ना बघता..
शिकवलेस तू आम्हाला की
मानव जातीच्या भल्यासाठी
निसर्गही हलवू शकतो तू.....अन....
जेव्हा प्रश्न असतो अस्तित्वाचा ,
नसतो कोणीच सगा.
तुझ्या मुळेच शिकलो
आम्ही गोड बोलून
मुग्ध हसून केलेली लबाडी
ही नसते लबाडी,
ते असते धर्म पालन
अन् समोरच्याचे प्राक्तन
कसे वाटले रे देवा तुला ,
द्रौपदीची वाचवताना लाज ,
गवळणींची चोरलेली वस्त्र
हातातून सुटत जाताना ,
आणि आपलेच हात
रिते होताना पाहताना .
समोरचा बरोबर असला
तरी धर्मा अधर्मा साठी
त्याला कपट करून मारताना,
आला का रे एकदा तरी
घशात तुझ्या आवंढा,
पापक्षालन करताना ढाळलास का
एक तरी अश्रू त्याच्या शवावर.
प्रेम केलेस राधेवर,वरलेस रुक्मिणीला
संसार केलास सोळा दश सहस्त्र नारिंशी
ज्या तुझ्या नव्हत्या कुणीच........
काय केलेस रे तेव्हा
मनाचे झालेल्या तुकड्यांचे तू....
फोडलास का रे टाहो अन्
केलेस का मोकळे स्वतःला
यमुनेच्या पाण्यात तू.
तुझे मोठे पण कशात आहे
माहित आहे का कान्हा तुला ,
होणारे सगळे माहित असूनही
गेलास तू त्याला सामोरा
अन् म्हणूनच तुझे हास्य नेहमीच
मला वाटले गूढ
बासरीचे सुर धीर गंभीर,करणा रे
अंतर्मुख...
आयुष्याचे सार सोपे करून दाखवलेस तू
अन् मरणाला गेलास शांतपणे सामोरा तू.
आम्ही मात्र आयुष्य धर्म न
जाणता कर्म करत राहिलो,
बासरीचे सुर ना ऐकता
रिते होत राहिलो.
तुझ्या शिकवणुकीचा
अर्थ ना कळल्यामुळे
राहिलो कायमच
कोरडे शुष्क पाषाण.
निस्वार्थ प्रेमापेक्षा करत राहिलो
धर्माचं राजकारण.
कारे डोळ्यात आले पाणी तुझ्या ,
अन् का बोलता बोलता झालास गप्प,
तु की नाही देवा आता कृती नाही
पण,
ह्यावेळी येताना घेऊन ये तुझे शब्द भांडार
कारण कृतीतून आचार विचार
शिकण्याचे दिवस झाले हद्दपार...
लक्षात ठेव कान्हा येत आहेस कलियुगात तू,
जिथे रक्तबंबाळ शब्दांच्या लालभडक
नदीतल्या द्वेषाच्या, तिरस्काराच्या
कलियाला मारायला .....
तुला व्हावे लागेल वज्र,
आणि बासरीच्या
ऐवजी हातात घ्यावे लागेल
सुदर्शन चक्र
